💥प्रयोगशील शेतकऱ्यांचे यशस्वी नेतृत्व प्रतापराव काळे -- डॉ.दिलीप शृंगारपुतळे....!


💥शेतकऱ्यांच्या लेकरांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी चालवलेली चळवळ म्हणजे पूर्णा तालुका शेती सेवा हा ग्रुप💥

परभणी : शेतकऱ्यांच्या लेकरांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी चालवलेली चळवळ म्हणजे पूर्णा तालुका शेती सेवा  हा ग्रुप. आज हा ग्रुप नाही तर ती एक यशस्वी प्रयोगशील शेतकऱ्यांची एकमेकांना आधार देणारी आणि मार्गदर्शन करणारी चळवळ बनली आहे. प्रतापराव काळे या पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुपचे संस्थापक. ज्या काळात व्हाट्सअप फेसबुक हा सोशल मीडिया एवढा सक्रीय नव्हता, तेव्हा फक्त वर्तमानपत्राच्या माध्यमातून शेती विषयक बातम्या आणि विचारांची देवाणघेवाण होत असे.

शेतकऱ्यांच्या यशोगाथा वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होत असत. एवढाच एक आशेचा किरण असे. या कालावधीत धानोरा काळे या पूर्णा तालुक्यातील गोदावरीच्या काठी वसलेल्या आडवळणाच्या दुर्गम गावी प्रताप काळे नावाचा एक तरुण शेतकरी स्वतःचा मार्ग शोधण्यासाठी धडपडत होता. कोणी पाठीशी मोठा मार्गदर्शक नाही, शिक्षणही जेमतेम. परिसरात ही काही फार नवीन वेगळं प्रयोगशील असं शेतीतलं काम नव्हतं. ज्याच्याकडे बघून वाटचाल करावी. म्हणून कुठल्याही जुन्या मळलेल्या वाटेने जाण्याची संधी उपलब्ध नसताना प्रतापरावांनी स्वतःची एक नवीन वेगळी वाट निवडली. आपल्या जेमतेम अल्पशा शेतीवर आपल्या कुटुंबाला घेऊन शांत चित्ताने, एकाग्रतेने त्यांनी आपले छोटे-मोठे प्रयोग करायला सुरुवात केली. सुरुवातीला फळबागेकडे वळत मोसंबी, चिकू यांची लागवड करून त्यांची विक्री करून चार पैसे अधिक कसे मिळवता येतील याचे मार्ग शोधले. पुढे बटाट्याचे ही विक्रमी उत्पादन घेऊन बाजारात भाव पडलेले असतानाही या पठ्ठ्याने गल्लोगल्ली जाऊन गाड्यावर, ऑटोमध्ये आपल्या उत्कृष्ट बटाट्यांची थेट ग्राहकांपर्यंत जाऊन विक्री केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बीजोत्पादनाचे महत्त्व पटवून देऊन व त्यांचा गट करून शेकडो एकर जमिनीवर बीजोत्पादन करून शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचे काम केले. शेतीमध्ये विविध प्रगत तंत्रज्ञानाचा वापर, पाण्याच्या बचतीसाठी प्लास्टिक आच्छादने, विविध प्रकारची प्रशिक्षणे, सेंद्रिय शेतीचा अवलंब, पिकते ते विकण्यापेक्षा विकते ते पिकवण्याचा आग्रह धरून शेतकऱ्यांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न प्रतापरावांनी सातत्याने केला. या कालावधीत एक प्रयोगशील शेतकरी म्हणून प्रतापरावांचे व्यक्तिमत्व पुढे आले. या व्यक्तिमत्त्वाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वृत्तपत्रातून प्रतापरावांच्या यशोगाथा आल्या, पण एवढ्याने हुरळून न जाता प्रतापरावांनी आपल्यासारखे टॅलेंट असणाऱ्या खेड्यापाड्यातील अनेक प्रयोगशील तरुणांना एकत्र करून सर्वांचे काम सोपे कसे करता येईल व एकत्रित मार्गदर्शन कसे देता येईल यासाठी " पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप " ची मुहूर्तमेढ रोवली. शेतकऱ्यांना एकत्र करत शेतकऱ्यांची एका माळेत गुंफण केली विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी यांच्याशी जिव्हाळ्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे नाते जोडले. आणि शेती सेवा ग्रुप ला पूर्णत्व आले. यानंतरच्या  कालावधीत कृषिभूषण कांतरावजी देशमुख झरीकर, विद्याताई पवार, एडवोकेट रमेशरावजी गोळेगावकर प्रा. विठ्ठल भुसारे, डॉ. दिलीप शृंगारपुतळे, गोविंदरावजी दुधाटे, बालासाहेब हिंगे, अमृतराजजी कदम, गजानन आंबोरे,कृषी पर्यवेक्षक प्रवीण काळे, दिवंगत दादा पवार यासारख्या मार्गदर्शकांना सोबत घेऊन शेती सेवा ग्रुप ला आणखी पुढच्या मार्गावर नेले.

दरमहा एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्याच्या प्रयोगशील शेतीचे प्रयोग बघत, प्रत्यक्ष अनुभवत, शेती सेवाचे सर्व शेतकरी दिवसभर एकत्र येत. त्यातून विचारांची, प्रात्यक्षिकाची देवाणघेवाण होई. अशा पद्धतीने अनेक शेतकरी उभे राहिले. रेशीम शेती, फळबाग, फुलशेती, चंदनशेती, दुग्ध व्यवसाय, भाजीपाला लागवड अशा अनेक क्षेत्रातील तज्ज्ञ शेतकऱ्यांनी आज पूर्णा तालुका शेती सेवा ग्रुप  दालन सजलेले आहे. याहीपुढे जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला आपला उत्पादित माल योग्य किमतीला विकण्यासाठी एकमेकांना हात देण्याचे काम चालू आहे. नरसिंह स्वयंसहायता बचत गट, दाळ मील, कृषी योद्धा शेतकरी उत्पादक कंपनी, शेती सेवा ट्रेडिंग कंपनी, बचत गट अशा विविध मार्गांनी आज शेतकऱ्यांना सोबत घेऊन सुविधा देण्याचे काम प्रतापराव सातत्याने करत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना "उद्यान पंडित" या पुरस्काराने दि.२ मे रोजी सन्मानित केले आहे.  प्रतापराव महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल माननीय भगतसिंगजी कोशियारी, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय कृषिमंत्री दादासाहेब भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सभापती नरहरी झिरवळ ,फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम,कृषी सचिव एकनाथ डवले,कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्या हस्ते "उद्यान पंडित" हा पुरस्कार नाशिक येथे होत असलेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात स्विकारला आहेत.  प्रतापराव,तुमचा सन्मान हा खेड्यापाड्यातील धडपडणार्‍या, शेतीमध्ये काहीतरी करू पाहणाऱ्या सर्व तरुण शेतकऱ्यांचा सन्मान आहे. तुमच्या यशात तुमच्या पत्नी, तुमचे आई-वडील, भाऊ, शेती सेवा तील सर्व सहकारी, कै. दादा पवार यांच्यासारखे मार्गदर्शक या सर्वांचा मोलाचा वाटा आहे.

गोदा तटीच्या अतिशय दुर्गम भागातील एका प्रयोगशील शेतकऱ्याचा आपली शेती ते राजभवनापर्यंतचा हा प्रवास निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आणि अनुकरणीय आहे. 

प्रतापराव काळे यांना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!

लेखक 

डॉ.दिलीप शृंगारपुतळे

ग्रामगीता अभ्यासक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या