💥भगवद्गीता हे कर्माचे तत्त्वज्ञान आहे - डॉ.सदानंद मोरे


💥गोटे महाविद्यालयाच्या 'तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' सातवे पुष्प संपन्न💥

वाशिम : मातोश्री . ताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे, तत्त्वज्ञान विषयाचा प्रचार व प्रसार करणे आणि संशोधकांचे संशोधन समोर आणणे या उद्देशाने  'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमाला आयोजित केली जाते. या व्याख्यानमालेचे सातवे पुष्प सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथील तत्त्वज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख तथा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी गुंफले. डॉ. मोरे यांनी 1982 या वर्षी पुणे विद्यापीठातून डॉ. मराठे यांच्या मार्गदर्शनात "दि गीता : ए थिअरी ऑफ ह्यूमन ॲक्शन" या विषयावर संशोधन केले. सदर संशोधन विषयाला अनुसरुन 15 एप्रिल 2022 या दिवशी त्यांनी "गीतेचा कर्मवाद" या विषयावर आपले व्याख्यान दिले.

डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या व्याख्यानातून, आपल्या संशोधन प्रबंधातील एका एका प्रकरणावर प्रकाश टाकला. त्यापैकी त्यांनी 'फॅलसी ऑफ कमिशन' या प्रकरणांमध्ये, गीतेमधील अर्जुनाचे जे प्रश्न आहेत ते मानसिक स्वरूपाची नाहीत तर ती तात्विक स्वरूपाची आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला. याशिवाय 'परस्पेक्टिवे ऑफ ह्यूमन ॲक्शन' या प्रकरणातून त्यांनी गीतेशी संबंधित असलेल्या युधिष्टिर,  दुर्योधन, श्रीकृष्ण, अर्जुन इत्यादींच्या वेगवेगळ्या दृष्टीकोनावर देखील प्रकाश टाकला. याप्रसंगी डॉ. सदानंद मोरे यांनी भगवद्गीता हे एक स्वतंत्र प्रस्थान आहे. ती श्रुती नाही तर स्मृति आहे. गीतेचा अभ्यास करीत असताना तिला उपनिषदाच्या चौकटीतून नव्हे तर महाभारताच्या चौकटीतून पाहिले पाहिजे. महत्त्वाचे म्हणजे "भगवद्गीता हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर ते सामाजिक, राजकीय आणि मानवी कर्माला प्रेरित करणारे तत्त्वज्ञान आहे," असे मत मांडले. 

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या