💥पुर्णेकरांनो असत्याची पाठराखन अन् सत्याला सातत्याने विरोध अरें आतातरी घेणार का काही बोध ?

 


 💥रेल्वेची सर्वच कार्यालय स्थलांतरीत होत असतांना लोकप्रतिनिधींची भुमिका संशयास्पद💥


💥पुर्णा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष स्व.भुजंगराव कदम यांच्या निधनामुळे रेल्वे संघर्ष समितीच्या संघर्षाला पुर्णविराम ?💥

✍🏻परखड सत्य :- चौधरी दिनेश (रणजीत)

संपूर्ण परभणी जिल्ह्यात सर्वात सधन व प्रगतशिल तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा तालुक्याच्या अधोगतिला शेवटी कारणीभूत कोण ? असा गंभीर प्रश्न येणाऱ्या काळात तरुण पिढीत उपस्थित होणार असून या पुर्णा शहरात मागील तिन ते साडेतीन दशकापुर्वीचा इतिहास बघितल्यास येथील औद्योगिक क्षेत्र अत्यंत प्रगतशील होते शहरात अनेक ऑईल मिल,कॉटन मिल,पोहा/मुरमुरा मिल एवढेच नाही तर निजामकाळात पुर्णेतील बाजारपेठ मसाला पदार्थांसाठी प्रसिद्ध होती तालुक्यातून वाहणाऱ्या पुर्णा-गोदावरी या दोन नद्यांमुळे कृषी क्षेत्रात सुध्दा आघाडीवर होता.


मराठवाड्यातील रेल्वेचे सर्वात मोठे जंक्शन असलेल्या पुर्णेत रेल्वेची अनेक महत्वाची कार्यालय कार्यान्वित होती परंतु तालुक्यासह जिल्ह्यातील संधीसाधू राजकीय पुढारी व अकार्यक्षम लोकप्रतिनिधीं मुळे येथील सर्वच महत्वाची कार्यालय नांदेड येथे स्थलांतरीत करण्यात आली वरिष्ठ राजकारण्यांतील गटबाजीला पाठबळ देणाऱ्या स्थानिक राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधींनी स्वतःची प्रगती साधण्यात जरी काही प्रमाणात यश मिळवले असले तरी तालुक्याच्या अधोगतीला मात्र हिरवा कंदिल दाखवल्याचेच निदर्शनास येते एकेकाळी येथे रेल्वेचे तब्बल पाच हजार कर्मचारी कार्यरत होते साडेतील दशकापुर्वी मराठवाड्यातील सर्वात मोठे जंक्शन असलेल्या पुर्णा जंक्शन येथील वैभवाला त्यावेळेस वाळवी लागण्यास सुरूवात झाली ज्यावेळेस येथील एरीया ऑफिसचे उद्घाटन होते या उद्घाटनास तत्कालीन मुख्यमंत्री स्व.शंकरराव चव्हाण आले असता त्यांना येथील लोकप्रतिनिधींसह स्थानिक राजकारण्यांनी सन्मानाची वागणूक न दिल्यामुळे सुडसत्रात खऱ्या अर्थाने सुरूवात झाल्याचे बोलले जाते.

पुर्णा येथे अस्तित्वात असलेले रेल्वे कंट्रोल ऑफिस,एरिया ऑफिस,रेल्वे पोलिस स्थानक,रेल्वेचे सर्व सुख सुविधायुक्त रुग्नालय,आयओएच ऑफिस,टिटीई स्टॉफ,इलेक्ट्रिक स्टॉफ,टिएक्सआर स्टॉफ आदीसह पुर्णेतील वेगवेगळे तत्सम विभाग बंद करून नांदेडला स्थलांतरीत करीत कर्मचाऱ्यांना पदस्थापना देण्यात आली एवढ्यावरच सुडनाट्य शमले नाही तर येथील मराठी,इंग्रजी व तेलगू माध्यम विद्यालय बंद करून अनेक शिक्षकांना रेल्वे विभागीय कार्यालय नांदेड येथे कारकूनी कामाला लावण्यात आले एवढ्यावरच न थांबता विभागीय रेल्वे कार्यालय नांदेड येथील तेलगू व अन्य भाषिक मराठीद्वेष्ट्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोईस्कररित्या कट रचून येथील क्र्यु-बुकींग लॉबीचे प्रखर विरोधानंतर ही सोईस्कररित्या विभागणी करून नांदेडला स्थलांतर केले परंतु स्थानिक राजकीय पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी या रेल्वे कार्यालयांच्या होणाऱ्या स्थलांतराला प्रखरपणे विरोध करण्याऐवजी उजेडात केवळ विरोधनाट्य रंगवत अंधारात मात्र संमती देण्याचे महापाप केले.

💥पुर्णा रेल्वे संघर्ष समितीने रेल्वे कार्यालयांच्या स्थलांतराला केला वेळोवेळी विरोध :-

पुर्णा रेल्वे संघर्ष समितीने रेल्वे कार्यालयांच्या स्थलांतराला वेळोवेळी केला विरोध परंतु स्थानिक राजकीय पदाधिकारी लोकप्रतिनिधींसह व्यापाऱ्यांचे ही रेल्वे संघर्ष समितीला खंबीर पाठबळ मिळाले नाही त्यामुळे पुर्णेतून रेल्वेची महत्वाची कार्यालय स्थलांतरीत होण्याची मालिका थांबता थांबली नाही परिणामी आज रेल्वेचे महत्वाचे जंक्शन असलेले पुर्णा रेल्वे जंक्शन व येथील कोट्यावधी रुपयांच्या विविध कार्यालयांसह रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे अक्षरशः भुत बंगल्यात रुपांतर झाल्याचे निदर्शनास येत असून अश्याच प्रकारे एकएक कार्यालय येथून नांदेडला स्थलांतरीत झाली तर पुर्णा जंक्शनचे रुपांतर एखाद्या छोट्याश्या रेल्वेस्थानकात होईल असा सतर्कतेचा इशारा वेळोवेळी पुर्णा संघर्ष समितीचे संयोजक तथा निवृत्त अभियंता ओंकारसिंह ठाकूर तथा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष व तत्कालीन काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते स्व.भुजंगराव कदम यांनी वेळोवेळी दिला परंतु त्यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींस व्यापारी व विविध राजकीय पक्ष पदाधिकारी यांनी आपल्या संकुचित मनोवृत्तीचा परिचय देत दुर्लक्ष केल्याने आज पुर्णा तालुक्याची दुर्दैवी अवस्था झाली असून याचा सर्वात मोठा परिणाम व्यापारपेठेवर झाल्यामुळे व्यापाऱ्यांवर माश्या मारण्याची वेळ आली आहे.

पुर्णा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष स्व.भुजंगरावजी कदम व संयोजक ओंकारसिंह ठाकूर यांच्यासह रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा दिल्ली गाठून रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिली व रेल्वे कार्यालयांच्या स्थलांतरासह विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय पुर्णेत स्थापण व्हावे याकरिता निवेदन दिली परंतु जिल्ह्यातील तत्कालीन लोकप्रतिनिधींसह व्यापाऱ्यांनी ही त्यांना खंबीर पाठबल न दिल्यामुळे आज पुर्णेकरांवर पश्चात्तापाची परिस्थिती ओढवली आहे 

पुर्णेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर सिध्दार्थ नगरासह रेल्वे परिसर शहरी भागाला जोडणारा 'ओव्हर ब्रिज'ला मंजुरी मिळवून देण्याचे महत्वपुर्ण कार्य पुर्णा रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष संघर्ष योध्दा स्व.भुजंगराव कदम व संयोजक संघर्ष योध्दा ओंकारसिंह ठाकूर यांनीच केले असून त्यांच्या या कार्याची व त्यांनी वेळोवेळी केलेल्या संघर्षाची इतिहासात नोंद राहिल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या