💥परभणीत महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूकीत अभूतपूर्व जल्लोष....!


💥हजारोच्या जनसमुदाने केले महामानवास अभिवादन ; जय भिमच्या गगनभेदी जयघोषाने दुमदुमले अवघे शहर💥

परभणी (दि.१५ एप्रिल) : आधुनिक भारताचे निर्माते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपुज्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त काल गुरुवार दि.१४ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत निघालेल्या मिरवणूकीत शेकडो मंडळांच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचा तसेच नागरीकांचा अभूतपूर्व असा जल्लोष होता.


        तब्बल दोन वर्षानंतर कोरोनाचे निर्बंध पूर्णतः शिथिल झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची भव्य मिरवणूक जल्लोषात निघणार, हे स्पष्ट होते. विशेषतः मध्यवस्तीसह चोहोबाजूंच्या वसाहतीतील विविध पक्ष, संघटना, संस्था, प्रतिष्ठान किंवा उत्सव समित्यांच्या पदाधिकार्‍यांनी या जयंती निमित्त गेल्या महिनाभरापासून विविध उपक्रम, कार्यक्रमांचे भक्कम असे नियोजन केले होते. पाठोपाठ गेल्या चार-सहा दिवसांपासून त्या त्या भागात मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली.

       गुरुवारी सकाळपासूनच त्या त्या भागांमधून अभिवादनाच्या कार्यक्रमांसह अन्य उपक्रम प्रचंड उत्साहात साजरे झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातसुध्दा अभिवादनाकरीता शिस्तबध्द पध्दतीने सकाळपासून रात्री उशीरापर्यंत लांबलचक रांगा लागल्या होत्या. पाठोपाठ सायंकाळपासून मिरवणूकांना सुरुवात झाली तेव्हा त्या त्या वसाहतींसह प्रमुख चौक व रस्ते गजबजले. जिंतूर रस्त्यावरील जांब नाका, मध्यवस्तीतील शनिवार बाजार मार्गे विविध मंडळांची वाहने हळूहळू मिरवणूकीच्या मार्गक्रमावर सरकु लागली, तसा तसा मिरवणूकीतील जल्लोष वाढत गेला.

        सुभाष रोड, शिवाजी रोड येथून मिरवणूक शिवाजी चौकाकडे प्रस्थान करु लागल्या. मिरवणूकीतील कार्यकर्त्यांच्या जल्लोषाने कळस गाठला. भिमरायाचा जयघोष आणि बॅन्ड, झांजपथक, विविध गाण्यांवर ताल, ठेका धरीत कार्यकर्त्यांनी नृत्य केली. मध्यवस्तीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महानगरपालिका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महानगर शाखा, प्रदेश काँगे्रस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे व शिवसेनेचे स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उत्सव समितींच्या पदाधिकार्‍यांचे पुष्पहार व स्मृतिचिन्हाद्वारे जोरदार स्वागत केले. या स्वागताने कार्यकर्ते भाराहून गेले. गांधी पार्कात भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी मिरवणूकीचे स्वागत केले. या व्यतिरिक्त विविध संस्था, संघटना व मंडळांनी कार्यकर्त्यांकरीता पिण्यासाठी थंडपाण्यासह नाष्टा, चहा पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था केली. मिरवणूकीवर पुष्पवृष्टी करीत स्वागत केले. गांधीपार्कापासून आर.आर. टॉवर तेथून नारायण चाळ कॉर्नर व पुढे स्टेशनरोड नागरीकांच्या गर्दीने अक्षरशः फुललेला होता. लहान मुलाबाळांसह अबालवृध्द व महिलांची संख्यासुध्दा लक्षणीय होती. विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांची शिस्त वाखाणण्याजोगी होती. मिरवणूकीतील एकूण जल्लोषच लक्षवेधी ठरला.

        शहर पोलिस यंत्रणेने मिरवणूकी दरम्यान प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. मिरवणूक सुरळीत व शांततेत पार पडावी या दृष्टीने विविध पक्ष व संघटनांचे नेते तसेच पोलिस अधिकारी सर्वतोपरी खबरदारी बाळगून होते. रात्री १२-०० वाजता बहुतांशी मंडळांनी ध्वनीक्षेप बंद करीत शिस्तीचे प्रदर्शन घडवले. मध्यरात्री मिरवणूकीचा समारोप झाला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या