💥भू कैलास म्हणजेच परळी वैद्यनाथ ; बारा ज्योतिर्लिंगापैकी ५ व्या क्रमांकाचे माता पार्वतीसह वास्तव्य असलेले स्वयंभू प्रभू वैद्यनाथ...!


💥परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र महिमा वाचकांना लाभावा यासाठीचा हा प्रासंगिक लेख💥


बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचव्या क्रमांकाचे माता पार्वतीसह वास्तव्य असलेले स्वयंभू  प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग इतर कुठल्याही ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्रा पेक्षा अधिक धार्मिक महत्त्व परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री आहे त्यामुळेच या पवित्र पावन भूमीस पृथ्वीवरील कैलास म्हणून पुराणात उल्लेख केला आहे. मंगळवार दि. १ मार्च २०२२ रोजी प्रभू वैद्यनाथांचा महाशिवराञ महोत्सव साजरा होत आहे. त्या निमित्त परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र महिमा वाचकांना लाभावा यासाठीचा हा प्रासंगिक लेख.     भारत भूमी ही देव भूमी म्हणून ओळखली जाते. तसेच महाराष्ट्रात बारा ज्योतिर्लिंगापैकी तब्बल पाच ज्योतिर्लिंग आहेत. परंतु परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधार आहे. देवगीरीचे यादव राजे रामचंद्र यांचे प्रधान हेमाद्रीपंत यांनी बाराव्या  शतकात हे मंदिर बांधले आहे. सोनपेठ तालुक्यातील डिघोळ गावा नजीक असलेल्या ञिशुला देवीच्या डोंगराचे खोदकाम करून तेथील काळ्या पाषाणाच्या शिला उपलब्ध करून हे सुंदर मंदिर उभे केले आहे. तर होळकर घराण्याच्या सुन आणि बीड जिल्ह्याच्या कन्या पुण्यश्लोक अहिल्या देवी यांनी शके १६९९ मध्ये जीर्णोध्दाराचे काम सुरू केले. आणि शके १७०६मध्ये हे काम पुर्ण झाले.  मंदिर परिसरातील पुर्व घाट,   उत्तर घाट, आणी तीर्थांचा जीर्णोध्दार केला आहे. त्या घटनेची आठवण म्हणून मंदिर परिसरात दिपमालेच्या समोर पुर्वाभिमुख पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचा शिल्पकार एस.बी.परदेशी यांनी आपले कौशल्य पणाला लावून  ब्रान्जचा अर्धाकृती पुतळा दि.७ मार्च १९८६रोजी  बसवण्यात आला आहे.मंदिरातील  पुर्व महाद्वार १९३८ साली जयवंतराव देशपांडे यांनी बांधले.  लाकडी सभामंडप परळीतील कै.रामराव शिवाजीराव ऊर्फ नानासाहेब देशपांडे यांच्या पुढाकारातून लोक सहभागातुन निर्माण केला आहे. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवल कमिटीची स्थापना इ.स.१८९० साली करण्यात आलेली आहे. त्या कमिटीचे पहिले सेक्रेटरी इटालियन व्यापारी गुस्टाओ ऊल्सी हे होते. गुस्टाओ ऊल्सी आणि कॅजिओ यांनी परळी शहरात पहिल्यांदा ५२ जिन्यांची कापसाची मिल सुरू केली. त्यांनीच परळी व्यापार पेठेतून जागल म्हणजे वैद्यनाथ फंड जमा करण्याचा कायदा सुरू केला होता. तर छञपती शिवाजी महाराज यांचे सैन्य परळी मार्गे कर्नाटक स्वारीवर जात असे. त्या सैन्याकडून परळीतील लोकांना काही ञास होऊनये या साठी मंदिराच्या विश्वस्थांकडे महाराजांनी अभयपञ दिले होते.  प्रभू वैद्यनाथ म्हणजे वैद्यांचा नाथ. परळी वैद्यनाथ मंदिरातील शिवलिंगात साक्षात धन्वंतरि विराजमान आहेत. त्यामुळेच या शिवलिंगास स्पर्श करून दर्शन घेण्याची अनादी काळापासूनची परंपरा आहे. तसेच समुद्र मंथन झाल्यानंतर देव आणि दानवात अमृत मिळवण्यासाठी मोठा वाद झाला होता. तेव्हा नारायणाने मोहिनी रूप धारण करून तो अमृत कुंभ प्रभू वैद्यनाथांच्या शिवलिंगात लपवला होता. त्यामुळे येथे स्पर्श करून दर्शन घेणार्या भाविकास प्रभू वैद्यनाथ अमृताचा वर्षाव करतात अशी दृढ धारणा भाविकांची आहे. प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री मंदिर परिसरात बाराही ज्योतिर्लिंगाची मंदिरे असल्यामुळे एकाच ठिकाणी सर्व ज्योतिर्लिंग दर्शन भाविकास घडते. परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री एकशे आठ तीर्थ आहेत. परंतु काळाच्या ओघात त्यापैकी बहुतांश तिर्थ लुप्त झाले आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या तिर्थापैकी मंदिराच्या दक्षिणेस हरिहर तीर्थ आहे. या तीर्थात प्रभू वैद्यनाथ रोज स्नान करून मंदिरात विराजमान होतात. तसा उल्लेख जुन्या पिढीच्या महिला जात्यावरील गात असलेल्या ओव्यातून प्रगट होत असे. 

हरि हर तिर्थ काठं /ओला कशानं ग झाला/देव बैजूबा गं माझा जटा निथळीत गेला ॥ 

याच हरिहर तीर्थावर संत जगमिञनागा महाराज यांना हरि आणि हर म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांनी सगून रूपात दर्शन दिले. म्हणून या तीर्थास हरिहर तीर्थ म्हणून संबोधले जाते. यासह नारायण तीर्थ, मार्कंडेय तीर्थ, अमृत कूपी तीर्थ, चक्र तीर्थ, गदा तीर्थ, मातृ तीर्थ, पितृ तिर्थ, सुर्य तीर्थ, गंगा तीर्थ अशी तीर्थे अस्तित्वात आहेत. 

*पाच राम मंदिर असलेले नाशीक नंतर केवळ परळी वैद्यनाथ ;- 

परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री प्रभू वैद्यनाथांच्या वास्तव्या सोबतच प्रभू रामाच्या पद्स्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी ज्याचा उल्लेख आनंदरामायणातील तीर्थ याञा खंडांत आलेला आहे. त्यामुळे च नाशीक क्षेञा प्रमाणेच परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री प्रभू रामाची काळा राम ,गोरा राम, सावळा राम, ढवळा राम, पवळा राम अशी पाच मंदिरे आहेत. 

* पौराणीक तीन नद्या आणि तिन गणपती 

परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री पुर्वेस  वेणूमती म्हणजे गणसिध्दी तिचाच अपभ्रंश घणशी नदी, वैद्यनाथ मंदिर आणि जुनी परळी या मधुन वाहणारी सरस्वती नदी म्हणजे आज जिला लेंडी असे संबोधले जाते तर परळी च्या पश्चिम दिशेला कन्हेरवाडी येथून जलालपुर लगत जाणारी ब्रम्हगंगा अशा तिन पौराणीक नद्या आहेत. याच बरोबर मंदिर परिसरात असलेले दक्षिण मुखी गणपती, संत जगमिञनागा महाराज मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारी बोंबल्या गणपती आहे. तर जुन्या परळी भागातील गणेशपार भागात  श्री गणेश मंदिर आहे. 

*संत नामदेव महाराजा प्रमाणे दासोपंतांसाठी प्रभू वैद्यनाथ पुराण ऐकण्यासाठी मंदिरा बाहेर आले ;-

दत्तं सांप्रदायिक दासोपंत बिदर येथून संसार त्याग करून काही काळासाठी परळी वैद्यनाथ येथे वास्तव्यास होते .त्या दरम्यान ते प्रभू वैद्यनाथ मंदीरात पुराण कथा सांगत ते ऐकण्यासाठी भावीक मोठी गर्दी करत असत. पण एक दिवस मंदिरातील पुजार्याने दासोपंतांना मंदिरात पुराण सांगण्यास मज्जाव केला. तुझी भाकडकथा बाहेर जाऊन सांगत बस असे म्हणून बाहेर काढले त्यावर न रागावता शांतपणे दासोपंत मंदिराच्या पुर्व दिशेच्या महाद्वाराच्या समोर कथा निरूपणास बसले. त्याच दरम्यान मंदिरातदर्शनाला आलेल्या भाविकांना मंदिरात प्रभू वैद्यनाथांची पिंड दिसेना सर्वञ हलकल्लोळ माजला. मंदिरात पिंड नाही. पुजारी घाबरले इकडे तिकडे शोध घेतला. तर ज्या ठिकाणी दासोपंत निरूपण करत होते तेथे त्यांना पिंड दिसली. सर्वांना दासोपंताचा अधिकार कळला. सर्व पुजारी दासोपंतांना शरण आले. व विनंती केली की हि पिंड दासोपंतानी प्रभू वैद्यनाथांची पिंड मुळ जागेवर ठेवावी अशी विनंती केली. तेव्हा दासोपंतांनी आपल्या अंगावरील उपरणे पिंडवर झाकले व प्रभू वैद्यनाथांना प्रार्थना करून मुळ जागी विराजमान होण्याची विनवणी केली. क्षणार्धात पिंड मुळ जागेवर जाऊन विराजमान झाली. ही घटना ज्या ठिकाणी घडली तेथे दासोपंताची समाधी आहे. मुळ समाधी अंबाजोगाईला आहे. अशाच प्रकारे संत नामदेव महाराज यांचे किर्तन ऐकण्यासाठी औढ्याचे मंदिर फिरले होते. 

*ब्रह्म देवाने स्थापन केलेली तीन शिवलिंगे परळी वैद्यनाथ मध्ये ;- 

ब्रम्हदेवाने परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्रात विविध काळात आणि विविध कारणासाठी तिन शिवलिंगाची स्थापना केली आहे. त्यापैकी सार्वजनिक स्मशानभूमीत मार्कंडेय तीर्थ जवळ एक दुसरे वैद्यनाथ मंदिराच्या दक्षिण घाटावर ब्रम्हेश्वर शिवलिंग आणि तिसरे मेरू पर्वताकडे जाताना भक्त निवासा शेजारी सिध्देश्वर लिंग असे तीन शिवलिंग ब्रम्हदेवाने स्थापन केलेले आहे. 

*मंदिरात तीन नंदी असलेले एकमेव ज्योतिर्लिंग ;-

इतर कुठल्याही ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री आपल्याला केवळ भगवान शंकराचा एकच नंदी दिसतो. परंतु परळी वैद्यनाथ मंदिरात तीन नंदी आहेत. त्याचे कारण असे की दिवसाचे तिन प्रहर असतात. त्या तीन प्रहर सेवा बजावण्याचे काम या तीन नंदी चे आहे. सकाळी वृषभ, दुपारी चंड, आणि संध्याकाळी चैव असे या तीन नंदी चे नाव आहेत. 

याच बरोबर डोंगर तुकाई मंदिर येथे नाणगापुर निवासी दत्तं महाराजांचे दुसरे अवतार प.पु.नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गुप्त रूपाने एक वर्ष अनुष्ठान केले. मोहिनी रूप धारण करून भस्मासूराचा वध केला असे भगवान विष्णू गोपीनाथ रूपाने वास्तव्यास असलेले झुरळे गोपीनाथ मंदिर, काळराञी देवीचे मंदिर, संत जगमिञनागा महाराज समाधी मंदिर, धनमना देवी मंदिर अशी अनेक मंदिरे परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्री आहेत. 

राजा रूक्मांगदाची नगरी म्हणजे आजची परळी,   सत्यवान साविञीची कथा येथेच घडली.चिल्लीया बाळाची कथा इथंच होऊन गेली आहे. संत गुरूलिंग स्वामी, संत वक्रेश्वर बुवा ,संत तुळशीराम महाराज, साध्वी बकुळा बाई, संत सोपान काका आदी संताची ही कर्मभूमी .

परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थक्षेत्र महिमा सांगणे एका लेखात शक्य नाही. काशी नका जाऊ कोणी/मीच आहे विश्वेश्वर/आश्वासन देतो आम्हा परळी चा/वैद्यनाथ ॥

महाशिवराञ पर्वकाळाच्या निमित्त केवळ स्थळ महात्म्ये कळावे यासाठी  प्रभू वैद्यनाथांच्या कृपेने केलेला हा लेख प्रपंच.

तरी न्यून ते पुरते |अधिक ते सरते | 

करूनि घ्यावे हे तुमते | विनविले मिया || 


लेखक ; गोपाळ रावसाहेब आंधळे परळी वैद्यनाथ 

9823335439

ई-मेल gopalandhale007@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या