💥परभणी जिल्ह्यात उद्या २७ फेब्रुवारी रोजी २ लाख १२ हजार बालकांना देण्यात येणार पोलिओ डोस...!💥आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गिते यांनी दिली💥 

परभणी (दि.२६ फेब्रुवारी) :- जिल्ह्यात उद्या २७ फेब्रुवारी २०२२ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ११ हजार ९३३ बालकांना १ हजार ५५३ बुथवर पोलिओ डोस देण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते यांनी दिली आहे.

     दि.२७ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील १ लाख ५७ हजार ९३२ तसेच मनपा क्षेत्रात ५४ हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. त्याकरिता ग्रामीण भागात १ हजार १७४, शहरी भागात १६९ आणि मनपा अंतर्गत २१० असे एकूण १ हजार ५५३ बुथवर लसीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त बस डेपो, रेल्वे स्थानक इत्यादी ठिकाणी सुध्दा लस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

     या कार्यक्रमासाठी ग्रामीण व शहरी भागात ३ हजार ४७३ आणि मनपा भागात६२० असे एकूण ४ हजार ०९३  आरोग्य कर्मचारी यांची बुथवर नेमणूक करण्यात आलेली असून, अंगणवाडी सेविका, आशा, शिक्षक तसेच खाजगी संस्थांचा देखील यामध्ये सहभाग घेण्यात आलेला आहे. ५ वर्षे पर्यंतच्या बालकांना पोलिओ सारख्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी या लसीचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व बालकांना या दिवशी पोलिओची लस पाजून कार्यक्रमात सहभागी व्हावे व सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी मा आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त मा देविदास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे, अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रकाश डाके यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या