💥नियमबाहय पध्दतीने होत असलेली अकृषीक कराची वसूल तात्काळ थांबवून प्रकरणाची चौकशी करावी....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी💥

परभणी (दि.२४ फेब्रुवारी) - शहरांमध्ये सध्या महसुल विभागामार्फत अकृषीक कराची वसूली नियम धाब्यावर बसवून व मनमानी पध्दतीने सुरु आहे ही अकृषिक कराची वसुली वाटमारी करावी त्या पध्दतीने वसुल केली जात आहे. मालमत्ताधारकांना वार्षिक अकृषिक कर किती आहे, आजच्या तारखे पर्यंत किती कर थकलेला आहे व तो किती वर्षापासून थकलेला आहे या बाबत कुठलीही अग्रिम नोटीस न देता तसेच रक्कम भरण्याबाबत आगावू नोटीस व कर भरण्यासाठी मुदत न देता धडक शास्ती व व्याज लावून अकृषिक कराची नोटीस दिली जात आहे. या नोटीसीमध्ये मालमत्तेचे क्षेत्रफळ, कधीपासून अकृषीक कर थकलेला आहे  व किती थकबाकी आहे याचा तपशिल न देता सरळ नोटीस पाठवून अकृषिक कर व शास्ती व्याजासह भरण्याबाबत दबाव टाकला जात आहे या बाबत प्रहार जनशक्ती पक्षाकडे अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत या सर्व तक्रारीची दाखल घेत आज प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकारी यांच्या सह निवासी उपजिल्हाधिकारी श्री.महेश वडदकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेली अकृषिक कर वसुली तत्काळ थांबवून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

या अकृषिक वसुली मध्ये गंभीर बाब म्हणजे महसूल विभागाकडे मालमत्ता धारकाच्या नावावर किती क्षेत्रफळ मालमत्ता आहे, मालमत्ता कोणाच्या नावावर आहे व अकृषिक कर कधी पासून भरलेला नाही याचा कुठलाही तपशिल नाही कारण तो नोटीस मध्ये दाखवलेला नाही. याहून हि गंभीर बाब म्हणजे शहरामध्ये महसुल विभागाचे कर्मचारी नोटीस तयार करतांना मालमत्ताधारकाच्या शेजारील व्यक्तीला मालमत्तेचा तपशील विचारून नोटीस तयार करत आहेत. अकृषीक कर भरण्यासाठी अगावू नोटीस व मुदत न देता धडक अकृषीक कर, त्यावरील शास्ती व व्याज अशी एकत्रित नोटीस देणे बेकायदेशीर व नियमबाहय आहे. शास्ती लावत असतांना मालमत्ता धारकास थकलेल्या अकृषिक कराच्या १० पट पासून ते ४५ पट पर्यंत शास्ती व व्याज आकारले जात आहे. या पध्दतीने होत असलेली अकृषीक कराची वसूली महसुल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीनुसारच व मार्च इंड या गोंडस नावाखाली चालू आहे. करीता संबंधीत विभागाचे कर्मचारी व अधिकारी यांची चौकशी करुन नियमबाहय पध्दतीने अकृषिकच्या नावाने खंडणी वसूल करणाच्या महसुल विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी व आतापर्यंत वसूल केलेला अकृषीक कर, शास्ती व व्याज यांचा हिशोब तपासून संबंधित प्रकरणाची तत्काळ चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी व ही नियमबाह्य वसुली तत्काळ थांबवावी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष तहसील कार्यालय, परभणी च्या विरोधात जनआंदोलन उभे करेल असे ही या निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, सर्कल प्रमुख श्याम भोंग, मिडिया प्रभारी नकुल होगे, शहर चिटणीस वैभव संघई, अमोल भिसाड, धर्मेंद्र तूपसमिंद्रे, शेख बशीर इत्यादींच्या सह्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या