💥राजकारण्यांचे हे ‘वस्त्रहरण’ कधी थांबणार ?


💥महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो वस्त्रहरणाचा प्रयोग सुरू आहे त्यातील पात्रांनी सभ्यतेची मर्यादा कधीचीच ओलांडली💥

महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे, त्याला तमाशाची उपमा देऊन मी त्या लोककलेचा अपमान करू इच्छित नाही. लोकनाट्य कलाप्रकारात सवाल-जवाब असतात, पण त्याचा दर्जा इतका ‘पातळ’ नसतो. शिवाय, समोर बसलेल्या रसिकांचे मनोरंजन करणे इतकाच त्याचा उद्देश असतो. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो वस्त्रहरणाचा प्रयोग सुरू आहे, त्यातील पात्रांनी सभ्यतेची मर्यादा कधीचीच ओलांडली आहे. पत्रपरिषदांतील आरोप-प्रत्यारोपांनी जनेतेचे प्रबोधन, मनोरंजन होत आहे, असे कोणाला वाटत असेल तर ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत. भरचौकात एकमेकांचे कपडे फाडण्याचा हा प्रयोग पाहून जनतेला अक्षरश: उबग आला आहे. एकमेकांवर आरोप करणारे सगळे एका माळेचे मनी आहेत. यात कोणीही धुतल्या तांदळाचा नाही. ना इकडचा ना तिकडचा! काल-परवा पर्यंत तुम्ही एका ताटात जेवत होतात. तेव्हा एकमेकांचे खरकटे दिसले नाही का ?

   शाहू-फुले-आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात आजवर राजकीय सभ्यता होती. सुसंस्कृतपणा होता. राजकारणाला वैचारिक बैठक होती. मतभेद होते, पण वैर नव्हतं. डावपेच होते, संघर्ष होता, पण आजच्या सारखे शत्रुत्व नव्हते. विधानसभेत सरकारवर तुटून पडणारे विरोधीपक्ष नेते सभागृह सुटल्यानंतर विधानभवनाच्या उपहारगृहात एकाच टेबलावर बसून जेवायचे. एसेएम जोशी, नानासाहेब गोरे, कॉ. श्रीपाद अमृत डांगे, बापू काळदाते, केशवराव धोंडगे, रामभाऊ महाळगी, भाई उद्धवराव पाटील, दत्ता देशमुख, गणपतराव देशमुख यांची संपूर्ण राजकीय हयात विरोधी बाकांवर गेली. पण सत्तेच्या लालसेपोटी या मंडळींनी कधीही आपला तोल ढळू दिला नाही. विधानभवन आणि निवडणुकीतील यांची भाषणे ऐकणे ही पर्वणी होती. या मंडळींनी कधीही आपल्या राजकीय विरोधकांचा उपमर्द होईल अशा शब्दांचा वापर केेला नाही. पण सध्याच्या राजकारण्यांनी सगळी मर्यादा ओलांडलेली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी इथल्या मातीत पेरलेल्या सभ्यतेच्या झाडाला गांजाची बोंडं येतील असे वाटले नव्हते. 

कोणी,कशात, किती खाल्ले अशा प्रकारच्या आरोप-प्रत्यारोपाच्या धुळवडीतून काहीच निष्पण्ण होणार नाही. मयसभेत द्रोपदीचे वस्त्रहरण होत असताना भीष्माचार्यांसारखे ढुढाचार्य मूग गिळून गप्प होते. श्रीकृष्णाने तिची लाज राखली. सध्या लोकशाहीचे जे वस्त्रहरण सुरु आहे ते थांबविण्यासाठी कोणता युगंधर येणार नाही. तेव्हा न्यायालयानेच स्वत:हून (‘स्यूमोटो’) या आरोप-प्रत्यारोपांची दखल घेऊन या सर्वांचा ‘सोक्षमोक्ष’ लावला पाहिजे. कारण, या देशातील न्यायदेवता अजून जागृत आहे.

साभार ; नंदकुमार पाटील यांच्या फेसबूक पेजवरूनटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या