💥विवेकानंद आश्रमास केंद्रीय आरोग्य सचिव डॉ.ओमप्रकाश शेटे यांची सदिच्छा भेट...!


💥आरोग्य सेवेचे केले कौतुक,आरोग्य सेवा पाहून समाधानी💥

✍️मोहन चौकेकर

हिवरा आश्रम ( चिखली  ) :  विवेकानंद आश्रम ही आरोग्य सेवेने संपूर्ण देशभर नावलौकीक प्राप्त केलेली धर्मदाय संस्था आहे. ज्यावेळी ग्रामीण, डोंगरी, आदिवासी, शासकीय किंवा खाजगी रूग्णसेवा अजिबात उपलब्ध नव्हती अशा वेळेपासून विवेकानंद आश्रमाने आपली आरोग्यसेवा सर्वदूर पर्यंत उपलब्ध करून दिली. निष्काम कर्मयोगी संत प .पू. शुकदास महाराजश्री हे सिध्दहस्त धन्वंतरी होते. आजही संस्थेचे रूग्णसेवा कार्य सुरू असून अनेक व्याधीग्रस्तांनी रोगमुक्तीचा आनंद देणारे केंद्र म्हणून लोकांमध्ये श्रध्दाभाव ठेवून आहे. असे उद्गार  केंद्रीय आरोग्य विभागाचे सहाय्यक सचिव डॉ.ओमप्रकाशजी शेटे यांनी रविवारी ता.२० रोजी विवेकानंद आश्रमास सदिच्छा भेट प्रसंगी काढले. विवेकानंद आश्रमात आगमन प्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. 

विवेकानंद आश्रमाचे शैक्षणिक संकूल हे केवळ शाळा, महाविद्यालयीन शिक्षण देणारेच ठिकाण नसून संस्कार, स्वावलंबन व तरूणांमध्ये  देशप्रेमाची भावना निर्माण करणारे ठिकाण आहे. मानवसेवेच्या उपक्रमांना नियोजित पध्दतीने राबवून त्यांना प्राधान्य क्रमाने गती देण्याचे काम आश्रमात बघायला मिळाले. कोरोना काळात सस्थेने लोकांना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून दिली. जनतेचे सामाजिक स्वास्थ राखण्यासाठी केलेले प्रयत्न अभिनंदनीय आहे. असे पुढे बोलतांना त्‍यांनी सांगितले. विवेकानंद आश्रम हे एक पर्यटनस्थळ म्हणून सुध्दा नावारूपास येत आहे. याठिकाणचा नयनरम्य गार्डन व चित्ताला शांती देणारे, मन एकाग्र करणारे विलोभनीय सौदर्य प्राप्त झालेले विवेकानंद स्मारक हे जिल्ह्याचे आभूषण आहे. वसतिगृहात शिकणारे विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असून पुरेशा सोयीसुविधे अभावी त्यांना शिक्षण घेता आले नसते. समाजाची ही गरज ओळखून संस्थेने सुरू केलेले मुला-मुलींचे वसतिगृह हे उद्याच्या सुज्ञ नागरीक निर्मितचे निर्माण केंद्र आहे. या परिसरात सेवा आणि समर्पणाचा गंध दरवळतो. निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजश्रींच्या दैदिप्यमान कर्तृत्वाचा व सेवेचा हा आलेख त्यांच्या पश्‍चातही गगनभेदी ठरवा व सर्वसामान्य माणसाची सेवा करण्याचे सर्वसामर्थ्य या संस्थेस प्राप्त व्हावे. अशी भावनाही त्यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केली. विवेकानंद आश्रमाच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ देवून यथोचित सत्कार केला. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विश्‍वस्त नारायण भारस्कर, पुरूषोत्तम आकोटकर, आश्रमाचे कार्यकर्ते सुभाष गणगणे, वसंतआप्पा सांबपूरे, प्राचार्य पंढरीनाथ शेळके, तथा आदि उपस्थित होते.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या