💥पुस्तकाला भावलेला 'माणूस' गेला कुठे ?


💥नरेंद्र लांजेवार यांनी मुलगा मकरंदला २० जानेवारी २०२२ ला व्हॉटस् अ‍ॅपला पोस्ट केले होते त्याचाच हा भावांश💥

.✍️राजेंद्र काळे : वृत्तदर्पण

प्रिय मकरंद....

मी चूकन आजारपणात कोमामध्ये गेलो तर, उपचार करत बसायचे नाही. माझे जे जे अवयव दान करता येतील ते त्वरित दान करण्याचा आग्रह धरावा व डॉक्टरांना ही माझी ईच्छा होती, याची कल्पना द्यावी. अवयवदान केल्यानंतर देह औरंगाबाद किंवा अकोल्याच्या मेडीकल कॉलेजला दान करावा. माझ्या मृत्युनंतर धार्मिक विधी करू नये. काही अपरिहार्य कारणामुळे अवयवदान किंवा देहदान स्विकारले गेले नाहीतर सरळ अग्नी द्यावा.पण त्यासाठी तीरडी करू नये, टिटवे धरू नये. चार ते पाच मित्रांनी स्ट्रेचरला खांदा द्यावा. खांदा देण्याचा मान मित्रवर्य डॉ.गणेश गायकवाड, रविकिरण टाकळकर, शाहिना पठाण, सुजाता कुल्ली, मनजीत सिंग, विनोद देशमुख, अरविंद शिंगाडे व डी.डी.देशमुख आणि मकरंद-मैत्री यांना द्यावा. चिताग्नी मकरंद-मैत्रीने धार्मिक विधी न करता करावा. देहदान झाले नाही व चिताग्नी दिलीतर रक्षा नदी, नाल्यात न टाकता ती सरळ सालईबनात नेऊन गोलाकार पाच झाडे या रक्षेतून लावावीत. घरून वड, पिंपळ, उंबर घेऊन जावा व तो सालईबनात अस्थी सोबत लावावा. ईतर दोन झाडे व एक बेल व एक कडूलिंब किंवा कदंब लावावा. ही ५ झाडे म्हणजेच माझी जीवनसमाधी समजावी. दरवर्षी मकरंदला व मित्र परीवाराला काही करावे वाटले तर एक कविसंमेलन जयंती किंवा पुण्यतिथीला जरूर घ्यावे. तिसरा दिवस, दहावं, तेरवी, दर महिण्याचे पान, वर्षश्राद्ध करू नये. राहते घर शक्यतोवर २५-३० वर्ष विकू नये. माझी सर्व पुस्तके दर्शनी भागात लावावी. जी शक्य आहे, ती पुस्तके पुन्हा प्रकाशित करावी. फुकट पुस्तके कोणाला वाचायला देवू नये. माझी घरातील व शाळेतील सर्व पुस्तके बाजूच्या हॉलमध्ये ७-८ कपाटांमध्ये मांडणी करून ठेवावे. इथे बसून संदर्भ शोधायला किंवा लेखी काम करणाऱ्या वाचकांनाच ती येथेच उपलब्ध करून द्यावी. घरी कोणतेही पुस्तक देऊ नये..जी काही थोडीफार आर्थिक पैसा पेन्शनपूर्वी मिळेल, तो प्रज्ञाच्या नावाने पोष्टात टाकून त्याचे दरमहा व्याज घेणे. जे काही अन्य पैसे मिळतील, त्याच्या मूळ रक्कमेला हात न लावता केवळ व्याजावर खर्च करावा. शक्यतोवर दोन्ही आदर्श विवाह करावे, पैसे खर्च करू नये. मकरंद नाहीतर मैत्रीने तरी माझ्या जागेवर अनुकंप तत्वावर नोकरी करावी, ही माझी शेवटची इच्छा तिने पुर्ण करावी. मकरंद बाहेरगावी जर स्थायीक झाला तर हे राहते घर मैत्रीला तिच्या आईनंतर नावावर करून द्यावे. साहित्य, कला, संस्कृती, वाचन प्रेरणा, समाजप्रबोधन, पर्यावरण रक्षण, लेखन, सामाजिक बांधिलकी या क्षेत्रात माझ्या मुलांनी काम करावे, अशी माझी अपेक्षा आहे. मला चांगला बाबा म्हणून तुमच्यासाठी खूप काही करता आले नाही, याची जरी खंत असली तरी तुम्ही काय करता? हे पाहणारे हजार डोळे नेहमी तुमच्याकडे राहतील, एवढे काम मी निश्चितच करून ठेवले आहे. मला दोन्ही मुलांचा अभिमान आहे, ते माझा विचार पुढे नेतील._

मकरंद, तू प्रज्ञाला व माझ्या आईला आयुष्यभर जपावे. जास्त अपेक्षा व्यक्त केली असेलतर जे करता येईल तेवढेच करा, पण नरेंद्र लांजेवार यांची मुलं वाईट निघाली.. असे बोट दाखविण्याची कोणाला संधी देऊ नका. भविष्यात मकरंदने प्रगती सार्वजनिक वाचनालय व तरुणाई फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य पुढे चालवावे.. समतोल भान ठेवून विवेकी जगावे!

 नरेंद्र लांजेवार, बुलडाणा

नरेंद्र लांजेवार यांचा मृत्यू १३ फेब्रुवारी २०२२  रोजी बुलडाणा येथे झाला. तब्बल ३ ते ४ महिने एका असाध्य आजाराशी त्यांनी कडवी झुंज दिली. मात्र त्यांना मृत्यूची चाहुल लागली होती म्हणून की काय, उपरोक्त पत्र त्यांनी मुलगा मकरंदला २० जानेवारी २०२२ ला व्हॉटस् अ‍ॅपला पोस्ट केले होते. त्याचाच हा भावांश

पुस्तकाला भावलेला ‘माणूस’ गेला कुठे ?

‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या प्रेम वाटणाऱ्या साने गुरुजींच्या पंक्तीतला अन् पंगतीतला नरेंद्र लांजेवार हा वाटेकरी अन् वाढेकरी. त्यांचे देहदान प्रेमदिनी १४ फेब्रुवारीला झाले. साहित्य, काव्य, संस्कृती, विचार, आचार वाटणारे अन् त्यात वाढ करत वाढणारे लांजेवार सर केवळ व्यक्ती वा संस्थाच नव्हते, तर विविध संस्थांसाठी दिशादर्शक अन् मार्गदर्शक असे वैचारीक कार्यकर्ते होते. इतरांना त्यांच्या प्रतिभेची ‘जाणीव’ करुन देतांना, स्वत: मागे राहण्याची ‘उणीव’ पत्करत. म्हणूनच वाचलेली-ऐकलेली, पुस्तकातून पाहिलेली व आरशाला भावलेली माणसे अनेक भेटतील.. परंतु पुस्तकाला भावलेला माणूस भेटणे विरळच! पुस्तकांचं ऐकून घेणारा व पुस्तकांजवळ राहणारे पुस्तकप्रेमी ग्रंथपाल म्हणजे नरेंद्र लांजेवार. आजोबांपासून नागपूरहून बुलडाण्यात स्थायीक झालेलं हे लांजेवार कुटूंब, त्यामुळं नात्यांचा गोतावळा या शहरात नव्हताच.. पण या माणसानं ‘अरे मित्रा’.. 

‘अरे मित्रा..’ या प्रेमळ हाकेतून लांजेवारांनी मित्रांचा गोतावळा वाढवला. आई-वडिल आरोग्य सेवेत, तेही ज्या रुग्णांना बहिष्कृत समजत अशा क्षय आरोग्य धाममध्ये. त्यामुळे ‘सेवा परमो धर्म’ हा संस्कार घरातूनच रुजला. स्टूडंट पेâडरेशन ऑफ इंडिया या डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी चळवळीत ते दाखल झाले, अन् त्यांनी भांडवली शिक्षणाविरुध्द चळवळ उभारली. मोर्चातून ‘बघता काय सामील व्हा..’ हे त्यांचं आवाहन इतर विचारसरणीलाही त्यांच्या विचारांशी सामील करणारं ठरलं. वाणिज्य शाखेतून पदवीधर झालेला हा युवक मात्र बँकेतील पैशांकडे न वळता बी-लीब करुन ग्रंथांच्या ग्रंथालयाकडे वळला. भारत विद्यालयात ग्रंथपाल म्हणून ‘सब के लिए खुला है, मंदीर यह हमारा..’ या राष्ट्रसंताच्या विचारांप्रमाणे त्यांनी ग्रंथांचं ज्ञानमंदिर विद्याथ्र्यांसाठी खुलं केलं. कुल्ली सरांसोबत शहरात प्रगती ग्रंथालय सुरु केलं. पैशांची नाहीतर ‘पुस्तकांची भिसी’, हा उपक्रम शहरात राबविला. सत्कारासाठी ‘बुके नव्हे बुक’ ही संकल्पना पुढे आणली._

माणूस रिता असतो, वाचन त्याला भरुन काढतं.. या जाणिवेतून विद्याथ्र्यांना अन् मित्रांना लिहतं करण्याआधी वाचतं केलं. पुढे अनेक लेखणीत त्यांनी विचारांची शाई ओतली. दुसऱ्यांकडून अनेक पुस्तक लिहून घेता-घेता स्वत: ११ पुस्तकं लिहली, अनेक वर्तमानपत्रांमध्ये स्तंभलिखाण, आकाशवाणीसाठी स्फुटलिखाण, दूरदर्शनपर्यंत उपक्रम पोहोचविलेत, विविध आघाड्यांवर विविध साहित्य संमेलने, व वाचन कार्यशाळा घेतल्यात. १४  एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीदिनी शहरात १४ बाल वाचनालय सुरु करुन ही चळवळ राज्यभर पोहोचवली. विदर्भ साहित्य संघात तोलामोलाची माणसं आणून तो समृध्द केला, अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनात जिल्ह्यातील अनेक साहित्यीकांना स्थान मिळवून देण्यासाठी धडपड केली. घुमानला नाथांची दिंडी घेवून गेले, हिवरा आश्रमला अ.भा.साहित्य संमेलन जाहीर करण्यात साहित्य महामंडळाला भाग पाडलं, या माणसाचा हा प्रयत्न मानवाच्या विरोधामुळे मात्र पूर्णत्वास गेला नाही.. हा भाग वेगळा

ताराबाई शिंदेंच्या स्मारकासाठी ते अतीआग्रही होते, बुलडाण्यात नाट्यगृह व बालभवन यासाठी त्यांनी आटापिटा केला. ‘माय’ कवितेचा बाप त्यांनी शोधला, ‘भारत माझा देश आहे..या प्रार्थनेचा निर्माता शोधून त्यात बदल सुचविले.  अंधश्रध्दा निर्मूलन चळवळीप्रती श्रध्दा निर्माण करण्याचे काम केले. सतत २५ वर्ष राष्ट्रीय सणांच्या शासकीय कार्यक्रमाचे सुत्रसंचालनही केले. सालईबन, सेवासंकल्प, नंदनवन अशा कृतीशील चळवळींना हात दिला!!

सर हे अनेकदा टिकेचे व मस्करीचेही विषय बनले, पण विचलीत न होता आपल्या ध्येयावर ते कायम राहीले. कृतीयुक्त शेवट त्यांचा राहिला. त्यांच्याविषयी लिहतांना काय व किती लिहावं? यासाठी हा कागदाचा कॅनव्हॉस अपुरा पडतोय. फक्त नजर भिरभिरुन शोधतेय.._

पुस्तकाला भावलेला ‘माणूस’ गेला कुठे ?

✍️राजेंद्र काळे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या