💥वाशिम नगर परिषद मुख्याधिकार्‍यांच्या वाहन भाड्या मध्ये १० लक्ष रुपये निधी अपहार....!


💥अपहार प्रकरणी स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे नगरविकास विभागाच्या अवर सचिवाचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र💥

फुलचंद भगत

वाशिम - कार्यालयाला पुरविण्यात आलेल्या चारचाकी वाहनांमध्ये १० लक्ष रुपयापेक्षा जास्त निधीचा अपहार केल्याप्रकरणी वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी व वाहन पुरवठा कंत्राटदार (अग्नीशमन विभागाचे कंत्राटी चालक) यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत जिल्हा नियोजन समिती सदस्य व शिवसैनिक नितीन मडके यांनी माहिती अधिकारातुन सादर केलेली कागदपत्रे व दिलेली तक्रार तसेच खा. भावना गवळी यांनी कार्यवाहीबाबत दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने येत्या २८ फेब्रुवारीपर्यत स्पयंस्पष्ट अभिप्रायासह मुद्देनिहाय अहवाल सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाच्या अवर सचिव प्रतिभा पाटील यांनी १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकार्‍यांना पाठविलेल्या पत्राव्दारे दिले आहेत. तसेच यापुर्वीच्या तक्रारीच्या अनुषंगाने मागीतलेला अहवाल देखील सादर करावा असे सुचित करण्यात आले आहे.

             या अपहार व भ्रष्टाचाराबाबत शिवसैनिक नितीन मडके यांनी माहिती अधिकारातुन मिळविलेल्या सर्व कागदपत्रांसह मुख्याधिकारी व वाहन पुरवठा कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी नगर विकास विभागाला १ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती.याबाबत नितीन मडके यांनी प्रधान सचिवांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, न.प. मुख्याधिकारी व न.प. प्रशासन अधिकारी असा पदभार असलेले मुख्याधिकारी यांनी अनेक कामे चुकीच्या पध्दतीने केली आहेत. त्यांनी स्वत:साठी चारचाकी वाहन भाडेतत्वावर घेण्याचा ठरावही चुकीच्या पध्दतीने घेतला. याबाबत मुख्याधिकार्‍यांन २८ मे २०२० रोजी दिलेल्या ई-निविदा सुचनेमध्ये कंत्राटदाराने वाहन चालविण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासह इतर अनेक अटी होत्या. मात्र वाहन पुरविण्याचा विषय आर्थिक असुन सुध्दा मुख्याधिकार्‍यांनी मोघम स्वरुपात कोणत्याही चर्चेविना हा ठराव घेतला. वाहन हे जानेवारी २०२० नंतरचे असावे असे नमुद असतांना कंत्राटदाराने बुकींग पावतीवरुन निविदा मंजुर केली. तसेच पुरविलेले महिंद्रा वाहन हे २०१६ च्या वर्षाचे होते. सदर वाहन विजय गणपत जाधव डाळींबी विहीर वाशिम यांचे असून हे वाहन न.प. ला पुरविण्याबाबत त्यांच्या व पुरवठादारामध्ये कोणत्याही प्रकारचा करारनामा झालेला नाही. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० पर्यत एमएच ३७ जी ६५९५ हे वाहन पुरवठा केल्याचे दाखवून ४८,९८० रुपये देयक काढण्यात आलेले परंतु आरटीआय कार्यकर्त्याला आर.सी.ची प्रत दिली नाही. यानंतर १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२० पर्यत सदर वाहनाचे १ लक्ष ६३ हजार ५३६ रुपये देयक झाले आहे. १ जानेवारी ते ३१ जुलै २०२१ पर्यत एमएच १४ जीडी २८१६ ही हुंडाई एस्कांट ची २०१६ ची ५ सिटर कार नियमाचे उल्लंघन करुन मुख्याधिकार्‍यांना पुरविण्यात आली व या कालावधीत तीचे ३ लाख ९५ हजार १०८ रुपये देयक अदा करण्यात आले.

    १ ऑगष्ट ते १ डिसेंबर २०२१ पर्यत मुख्याधिकार्‍यांना पुरविण्यात आलेल्या एमएच ३७ एबी ८१०० या वाहनापोटी २ लाख ८२ हजार ५१७ रुपये देयक अदा करण्यात आले. यावरुन १७ जुन २०२० ते डिसेंबर २०२१ या कालावधीत वाहन वापरल्याप्रकरणी पुरवठादाराला एकुण १० लाख १७ हजार १५१ रुपये इतके देयक देण्यात आल्याचे माहिती अधिकारातुन उघड झाले आहे. तसेच मुख्याधिकार्‍यांनी शासकीय दरापेक्षा जास्त दराने वाहन पुरवठा करुन घेतला आहे. तसेच कोरोना काळात मुख्याधिकार्‍यांना कोरोनाची लागण झाली व अनेक वेळा ते शासकीय कामावर नसतांनाही त्यांनी वाहनाची देयके काढली आहे. महिन्यातुन आठ शासकीय सुट्या याव्यतीरिक्त ते वैयक्तीक रजेवर असतांनाही देयके काढण्यात आली आहेत. सदर वाहन मुख्याधिकारी व्यतीरिक्त कोणीही वापरलेले नाही. तसेच सदर वाहनाचे लॉगबुक गहाळ झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्त्याला देण्यात आली. यावरुन मुख्याधिकार्‍यांनी पुरवठादारासोबत संगनमत करुन लाखो रुपयाची अफरातफर केल्याचे स्पष्ट दिसते.

    यातील मोठी बाब म्हणजे वाहन पुरवठाधारक हा न.प.च्या अग्नीशमन विभागात कंत्राटी कर्मचार्‍यांमध्ये अग्नीशमन वाहनावर चालक म्हणून कार्यरत असून वेतन घेत आहे. मुख्याधिकारी यांनी सुध्दा चुकीच्या निविदा तीनवेळा प्रसिध्द केल्या आहेत. यामध्ये एकच पुरवठाधारकाच्या निविदा आल्या. मुख्याधिकारी यांनी दीड वर्षात एकही रजा न घेता दीड वर्ष सतत वाहनाचा वापर केल्याचे दिसते. मुख्याधिकार्‍याचे घर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा न.प. पासून ३ किमीपेक्षा जास्त नसतांना त्यांनी ५० किमी. दररोज वाहन दाखवून बाहेरगावी जाण्याकरीता वेगळे दर लावले आहेत. माहिती अधिकारा अंतर्गत मागीतलेल्या सर्व कागदपत्रावरुन मुख्याधिकारी यांनी पुरवठादारासोबत संगनमत करुन लाखो रुपयाचा अपहार केला असून त्यांच्याविरुध्द अनेक गैरव्यवहार व गैरप्रकाराच्या तक्रारी आहेत. त्यामुळे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना सेवेतून निलंबित करावे व अपहाराची रक्कम त्यांच्याकडून वसुल करुन अशी मागणी शिवसैनिक नितीन मडके यांनी नगरविकास विभागाला दिलेल्या तक्रारीत केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या