💥चिखली तालुका पत्रकार संघाचा जीवनगौरव पुरस्कार दीपक नागरे यांना प्रदान...!


💥या कार्यक्रमास आमदार सौ.श्वेताताई महाले यांची प्रमुख उपस्थिती💥 

 ✍️ मोहन चौकेकर 

चिखली : चिखली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून दिला जाणारा आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार यावर्षी साखरखेर्डा येथिल ज्येष्ठ पत्रकार दीपक नागरे यांना आज दि.०६ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात मान्यवरांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष इफ्तेखार खान यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास आमदार सौ.श्वेताताई महाले, ठाणेदार अशोक लांडे, पंचायत समितीच्या सभापती सौ.सिंधुताई तायडे, ज्येष्ठ पत्रकार मनोहररराव गायकवाड, माजी नगरसेवक रामदासभाऊ देव्हडे, डॉ.संजय घुगे, भाजयुमोचे जिल्हा सचिव बंडुभाऊ आंभोरे, गजानन सोळंकी यांची यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

यावेळी मंचावरील मान्यवरांच्याहस्ते दीपक नागरे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गौरवचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आमदार सौ.श्वेताताई महाले यांनी आपल्या मार्गदर्शनातून तालुका पत्रकार संघाच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. जीवनगौरव पुरस्कारप्राप्त पत्रकार दीपक नागरे यांचे अभिनंदन करत त्यांची पत्रकारिता अधिकाधिक समाजोपयोगी होईल व यातून नवपत्रकारांना प्रेरणा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. यासोबतच आमदार महाले यांनी उपस्थित पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देखिल दिल्या. ठाणेदार अशोक लांडे यांनी आपल्या मनोगतातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आदर्शवादी पत्रकारिता आजच्या पिढीतील पत्रकार देखिल यापूढे चालवतील अशी आशा बोलून दाखविली. 

तालुका पत्रकार संघाच्या आजवर विविध सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले आहे. यावर्षी देखिल अशाच प्रकारे संघाचे सदस्य इम्रान शहा यांचे बंधू इब्राईमशहा यांना कर्करोगाच्या दुर्धर आजारावरील वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली.  

सत्कारास उत्तर देतांना दीपक नागरे यांनी माझ्या सारख्या ग्रामीण भागातील पत्रकाराच्या कार्याची दखल घेवून जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल चिखली तालुका पत्रकार संघाचे आभार मानले. व या पुरस्कारातून आपणांस अधिकाधिक जबाबदारीने पत्रकारिता करण्याची ऊर्जा प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी रामदासभाऊ देव्हडे यांचेसुध्दा समायोचित भाषण झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक छोटू कांबळे, सुत्रसंचालन संजय खेडेकर, व आभार प्रदर्शन रेणुकादास मुळे यांनी केले. 

सदर कार्यक्रमास तालुका पत्रकार सर्व सदस्य तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते   उपस्थित होते. सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.....

 ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या