💥लसीकरणाच्या ड्युटीवर शिक्षिकेच्या मेंदूला दुखापत ; उपचारासाठी आर्थिक मदतीची शिक्षकांची मागणी....!

 


💥कर्तव्यावर असतांना चक्कर येऊन पडल्याने शिक्षिकेच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने  करावी लागली शस्त्रक्रिया💥

परभणी : जिल्ह्यातील सेलू येथील नूतन विद्यालयातील शिक्षिका सूर्यकला अनुरोध सूर्यवंशी, लसीकरणाच्या कर्तव्यावर असतांना चक्कर येऊन पडल्या. त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या  परभणी येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शासनाने सूर्यवंशी यांना तातडीने पुढील उपचार व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिक्षकांनी शनिवारी, २४ डिसेंबर रोजी  केली आहे. 


याबाबत उपविभागीय अधिकारी अरूणा संगेवार यांना भेटून शिक्षकांनी निवेदन दिले आहे. सूर्यवंशी ह्या तहसीलदारांच्या आदेशानुसार उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणासाठी कर्तव्य बजावत होत्या. १७ डिसेंबर रोजी त्या चक्कर येऊन तेथेच पडल्या. त्यांना सेलू येथील एका खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर परभणी येथे पाठविण्यात आले. तेथे एका खासगी रुग्णालयात त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शासनाच्या परिपत्रकानुसार लसीकरणाच्या  कर्तव्यावर असताना शिक्षक कर्मचाऱ्याच्यावर हा जीवघेणा प्रसंग आला. त्यामुळे भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या कोरोना काळात कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी आणि त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी ज्या विविध योजना व सवलती आहेत, त्या निधीतून सूर्यकला सूर्यवंशी यांना आर्थिक मदत देण्यात यावी. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शिक्षक प्रतिनिधी परसराम कपाटे, उज्वला लड्डा, भगवान देवकते, संतोष क्षीरसागर, विशाल क्षीरसागर, अनंतकुमार विश्वंभर, सुरेश हिवाळे, काशिनाथ पल्लेवाड, फुलसिंग गावित, विजेंद्र धापसे, सुनिता सांगुळे , शुभांगी आष्टीकर, लक्ष्मण वांगे , वर्षा कदम, आरती कदम, सुनिता दहीफळे यांची उपस्थिती होती...

छायाचित्रे  ; प्रतिकात्मक

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या