💥वेद सर्वांसाठी आहेत - डॉ. साहेबराव निगळ


💥गोटे महाविद्यालयाच्या 'तत्त्व-प्रकाश व्याख्यानमालेचे' तिसरे पुष्प संपन्न💥

वाशिम ;  स्थानिक मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील तत्त्वज्ञान विभागाद्वारे तत्त्वज्ञान विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आयोजित 'तत्त्व-प्रकाश' व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प मुंबई विद्यापीठाच्या वेदांत वल्लभ संशोधन केंद्राचे माजी विभाग प्रमुख डॉ. साहेबराव निगळ यांनी गुफले. 

मानवी जीवनात तत्त्वज्ञान हे एक महत्वाचा विषय आहे तेव्हा अशा या महत्त्वपूर्ण विषयाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय येथील तत्वज्ञान विभागाद्वारे ही 'तत्व-प्रकाश' व्याख्यानमाला सुरू करण्यात आली आहे. या व्याख्यानमाले अंतर्गत प्रत्येक महिन्याच्या पंधरा (15) तारखेला रात्री 08 वाजता एक व्याख्यान आयोजित केले जाते. दिनांक 15 डिसेंबर 2021 रोजी व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प मुंबई विद्यापीठाच्या वेदांत वल्लभ संशोधन केंद्राचे माजी विभाग प्रमुख डॉ. साहेबराव निगळ यांनी गुफले. 

डॉ. निगळ यांनी 1981 या वर्षी मुंबई विद्यपीठातून डॉ. एस. जि. मुद्गल यांच्या मार्गदर्शनात वेदातील नैतिक विचारांना अनुसरून संशोधन केले. सदर संशोधन विषयाला अनुसरुन 15 तारखेला त्यांनी 'वैदिक मूल्यविचार'' या विषयावर आपले व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानातून डॉ. निगळ यांनी, वेद हे सर्वांसाठी आहेत. वेदांचा अभ्यास करण्याचा सर्वांना समान अधिकार आहे. हीच बाब या आधुनिक काळात दयानंद सरस्वतींनी वेदातील ऋचांच्या आधारे स्पष्ट करून सांगितली आहे. इंग्रज भारतात आले, त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि वेदांचे महत्व ही स्वीकारले. पण आम्ही भारतीयांनी वेदांकडे त्या दृष्टीकोनातून पाहिले नाही. इंग्रजांनी संस्कृत भाषा शिकली. पण आम्ही मात्र तिला देवभाषा म्हणून मर्यादित ठेवले, अशी खंत डॉ. निगळ यांनी व्यक्त केली. आज संस्कृत भाषेचे महत्व कमी होऊन इंग्रजी प्रभावी ठरली आहे, मात्र या साठी कोण जबाबदार आहेत ? असा प्रश्न डॉ. निगळ यांनी उपस्थित केला. शिवाय वेदाचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री डांगे, श्री चटोपाध्याय यांच्या वेदविषयक लिखाणाची चिकित्सा करण्यासंबंधीची भावना ही यावेळी त्यांनी व्यक्त केली.

व्याख्यानाच्या प्रारंभी व्याख्यानमालेचे आयोजक तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ. वेदप्रकाश डोणगावकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन देत व्याख्यानमालेचा उद्देश स्पष्ट केला. आणि व्याख्यानानंतर व्याख्यात्यांचे व उपस्तितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या विविध विद्यापीठातील प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, विद्यार्थी आणि तत्त्वज्ञान प्रेमी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या