💥परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांच्या 'छळास' कंटाळून वैद्यकीय अधिकार्‍याने दिला राजीनामा...!


💥मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांनी २ वेतनासह दरमहा १० हजार रुपयांची मागणी केल्याचा दावा💥

परभणी (दि.०९ डिसेंबर) : परभणी जिल्हा परिषदेंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या भ्रष्ट व अवमानकारक वागणूकीस कंटाळून पिंपळदरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.रविंद्र देशमुख यांनी राजीनामा दिला आहे.

     सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविलेल्या या राजीनामा पत्रातून वैद्यकीय अधिकारी डॉ. रविंद्र देशमुख यांनी आपण भूसावळ येथील भूसावळ ट्रामा केअर युनिट येथून बदलीने 17 सप्टेंबर 2021 रोजी शासन निर्णयानुसार परभणीत हजर झालो. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टाकसाळे यांच्याकडे अर्ज केला. तेंव्हा तुमची शासनाकडून बदली होवून आपणास पिंपळदरी आरोग्य केंद्र दिले आहे. परंतु, मी माझ्या अधिकारात या मध्ये बदल करुन आपणास हवे ते केंद्र देवू शकतो, परंतु त्या करीता आपणास मला दोन महिन्यांचे मासिक वेतन द्यावे लागेल व नंतर दरमहा 10 हजार रुपये द्यावे लागतील, अशी अट त्यांनी माझ्यासमोर ठेवल्याचा आरोप डॉ. देशमुख यांनी या राजीनामा पत्रातून केला आहे. आपण यास स्पष्ट नकार दिला. मी कोणाकडून पैसे घेत नाही व कोणाला पैसे देत नाही, असे म्हटल्याचेही नमूद केले.

      या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या अवतीभवती असणार्‍या प्रभारी जिल्हास्तरीय अधिकार्‍यांनी आपल्याबद्दल त्यांच्याकडे तक्रारी केल्याचे समजल्यानंतर आपणास सीईओंकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्या गोष्टीच खुलासा आपण केला. परंतु, दि. 05 डिसेंबर रोजी सीईओ टाकसाळे यांनी मोबाईलद्वारे संपर्क साधून पुन्हा पैशाची मागणी केली. असंसदीय भाषा वापरली. माझ्या हाताखाली काम करायचे असेल तर इतरांप्रमाणे दरमहा पैसे द्यावे लागतील, असे म्हटले. या सर्व गोष्टींचा मी परत विरोध केल्यानंतर मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केलेल्या सभेत सीईओ टाकसाळे यांनी आपल्याबद्दल असंसदीय भाषा वापरली. त्यामुळे आपणास मोठा मानसिक त्रास झाल्याचे डॉ. देशमुख यांनी नमूद केले.

     टाकसाळे यांचा पूर्व इतिहास पाहिला असता बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेत बँकेचे प्रशासक असतांना भ्रष्टाचारामुळे त्यांना विधानमंडळाने निलंबीत केले होते. त्यामुळे अशा भ्रष्ट अधिकार्‍याच्या हाताखाली काम करणे अशक्य आहे, असेही डॉ. देशमुख यांनी या पत्रात म्हटले. लसीकरण काम कमी आहे. त्यासाठी मला वैयक्तिक जबाबदार धरणे योग्य वाटत नाही. यापूर्वी ज्या वैद्यकीय अधिकार्‍यांमुळे काम कमी झालेले आहे त्यांना मात्र सन्मानाची वागणूक देण्यात येत आहे. मला मात्र हेतुपुरस्सर आर्थिक, मानसिक छळ देण्याचे प्रकार सुरु असून या त्रासास कंटाळूनच आपण राजीनामा देत आहोत. दि. 08 डिसेंबर पासून पुढील तीन महिन्यांकरीता आगावू नोटीसीद्वारे सूचना देत आहोत, असे डॉ. देशमुख यांनी या पत्राद्वारे म्हटले आहे.

      दरम्यान, वादग्रस्त सीईओ टाकसाळे यांच्या कार्यपध्दती विरोधात एका वैद्यकीय अधिकार्‍यानेच ते सुध्दा थेट लेखी पत्राद्वारे गंभीर स्वरुपाचे आरोप केल्याने जिल्हा परिषद वर्तूळात मोठी खळबळ उडाली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या