💥परभणी मनपा हद्दीत विनामास्क फिरणार्‍यांविरुध्द मनपा प्रशासनाकडून कारवाई होणार...!


💥मनपा प्रशासनाकडून सहा पथके नियुक्त💥

परभणी (दि.०२ डिसेंबर) :  महानगरपालिका हद्दित विनामास्क फिरणार्‍या नागरीकांविरुध्द महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाईचा निर्णय जाहीर केला आहे.

      कोरोना विषाणूच्या संभाव्य तीसर्‍या लाटेच्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांप्रमाणे महापालिकेने नागरीकांना मास्क घालूनच फिरावे, असे आवाहन केले आहे. विनामास्क फिरणार्‍या नागरीकांविरुध्द दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. नागरीकांनी या कारवाईला सामोरे जाण्याऐवजी मास्क घालूनच दैनंदिन व्यवहार करावेत, असे प्रशासनाने नमूद केले आहे.

      दरम्यान, महापालिका प्रशासनाने विसावा कॉर्नर, जाम नाका, गंगाखेड नाका, शिवाजी चौक, गांधी पार्क, काळी कमान, अपना कॉर्नर या ठिकाणी पथकांची नियुक्ती केली आहे. स्वच्छता निरीक्षकांच्या अधिपत्याखाली या पथकांद्वारे विनामास्क फिरणार्‍या नागरीकांकडून तीन हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, मेहराज अहेमद, श्रीकांत कुरा, न्यायरत्न घुगे, मुकादम अरुण काळे, तोहीत खान यांच्या नेतृत्वाखाली पथके स्थापन करण्यात आली आहेत.

      दि. 1 डिसेंबर पासून शहरात सकाळी 9 ते सायंकाळी 5  व दुपारी 2 ते रात्री 9 या दरम्यान ठिकठिकाणी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी लस घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या