💥वाशिम जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींना पहिला डोस 10 डिसेंबरपर्यंत दयावा - जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.


💥जिल्हाधिकाऱ्यांनी तालुकास्तरीय यंत्रणांचा कोरोना लसीकरण आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला💥

फुलचंद भगत

वाशिम : कोरोना प्रतिबंध करण्यासाठी लस घेणे आवश्यक आहे. भविष्यात कोरोनाची तिसरी लाट केव्हा येईल हे निश्चित सांगता येत नाही. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करणे हा  एकमेव उपाय आहे. जिल्ह्यातील सर्व पात्र व्यक्तींचे पहिल्या डोसचे 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण लसीकरण करण्यात यावे. असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी दिले.

29 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी तालुकास्तरीय यंत्रणांचा कोरोना लसीकरण आढावा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, श्री. विंचणकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धर्मपाल खेडकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

श्री. षण्मुगराजन म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे रुग्ण संख्येत देखील घट झाली आहे. तरी देखील कोणत्याही व्यक्तीने बेसावध राहून चालणार नाही. कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन प्रत्येक व्यक्तीने करावे. कोविड अनुरूप वर्तनाबाबत सेवा प्रदाने, परवानाधारक, जागांचे मालक व आयोजकांसह सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक व अतिथींनी देखील पालन करणे आवश्यक आहे. कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, समारंभ व संमेलने इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींकडूनच व्यवस्थापन करण्यात येत असल्याची खात्री करावी. या ठिकाणी येणारे सर्व अभ्यागत व ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे. असेही श्री. षण्मुगराजन यांनी  सांगितले.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमॉक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने नव्या मार्गदर्शक सूचना लागू केल्याची तसेच ओमॉक्रॉनबाबतची माहिती देऊन श्री. षण्मुगराजन म्हणाले, चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय व सभागृह इत्यादी बंदिस्त जागेत घेण्यात येणाऱ्या जागेच्या क्षमतेच्या 50 टक्केच लोकांना परवानगी देण्यात यावी. संपूर्ण खुल्या असलेल्या जागेत समारंभासाठी जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी देण्यात यावी. ज्या ठिकाणाच्या बाबतीत क्षमतेबाबत निश्चितता नसेल तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास क्षमता ठरविण्याचा अधिकार राहील. कोविड -19 प्रसाराचा धोका लक्षात घेता काही ठिकाणी कोविड अनुरूप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रतिनिधीला कार्यक्रम पूर्णपणे किंवा अंशतः बंद करण्याचे आदेश देण्यात येतील. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत, अशांचे पूर्ण लसीकरण केले आहे, असे समजण्यात येईल.असे श्री.षण्मुगराजन म्हणाले.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने अनुरूप वर्तनविषयक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, सर्व संस्थांनी व त्यांच्या कर्मचार्यांिनी तसेच त्यांच्या परिसरात भेट देणाऱ्या व्यक्ती, ग्राहक संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी व्यक्तीं नी देखील कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे. कोविड अनुरूप वर्तानाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक प्रसंगी 500 रुपये दंड आकारण्यात येईल. संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत जर एखादया व्यक्तीने कसूर केल्याचे दिसून आल्यास त्या व्यक्तीला दंड लावण्याव्यतिरीक्त त्या संस्था किंवा आस्थापनांना सुध्दा 10 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. संस्था किंवा आस्थापनेने कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करण्यास कसूर केला तर प्रत्येक प्रसंगी 50 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. वारंवार सांगून सुध्दा कसुर केला जात असेल तर कोविड अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. असे श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले.

यावेळी तालुकास्तरीय यंत्रणांनी केलेल्या लसीकरणाची माहिती देवून लसीकरणाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती यावेळी दिली. या आढावा सभेला उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या