💥लसीकरण वेगाने करण्यासोबतच यंत्रणा सतर्क असावी - पालकमंत्री शंभुराज देसाई


💥व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे ओमॉक्रॉन संसर्ग टाळण्याच्या पूर्वतयारीचा आढावा💥

फुलचंद भगत

वाशिम : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी ओमॉक्रॉनचा संसर्ग लक्षात घेता सर्वच पात्र व्यक्तींचे लसीकरण वेगाने पुर्ण करण्यात यावे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रतिबंध करण्यासाठी यंत्रणा सतर्क असावी असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

आज 30 नोव्हेंबर रोजी पालकमंत्री श्री. देसाई यांनी ओमॉक्रॉनचा विषाणूचा संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने पुर्व तयारीचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून घेतला, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधिक्षक बच्चनसिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर व प्रभारी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धर्मपाल खेळकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

श्री. देसाई म्हणाले, जिल्हयात कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात यावे. विविध समारंभ व विवाह सोहळयाला होणारी गर्दी टाळण्यासाठी लोकांच्या उपस्थितींची मर्यादा 50 टक्के करण्यात यावी. जिल्हयातील रुग्णालयांचे फायर व स्ट्रक्चरल ऑडिट वेळेत करण्यात यावी. आरोग्य यंत्रणांची यंत्र सामुग्री सुसज्ज असावी. काही अडचण असल्यास त्याबाबत अवगत करावे असे ते म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन म्हणाले, जिल्हयात कोविड लसीकरणाचा वेग वाढला आहे. पहिला डोस 74 टक्के आणि दुसरा डोस 45 टक्के झाला आहे. दोन दिवसांपासून सभागृहाची क्षमता 50 टक्के करण्यात आली आहे. जिल्हयातील ऑक्सीजनचे पाचही प्लँट तयार आहेत. लसीचा पुरेशा साठा उपलब्ध असल्याची माहिती देवून जिल्हयात आयसीयु, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर व बालकांसाठी उपयुक्त असलेल्या बेडची माहिती दिली. जिल्हयात सद्यस्थितीत केवळ 4 सक्रीय कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत असल्याचे श्री. षण्मुगराजन यांनी सांगीतले. 

श्रीमती पंत यांनी ग्रामीण भागात करण्यात येत असलेल्या लसीकरणाची माहिती देवून सर्वच पात्र व्यक्तींना 10 डिसेंबरपर्यंत पहिला डोस देण्याचे नियोजन करण्यात आल्याचे सांगीतले. श्री. सिंह यांनी जिल्हयातील कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या