💥परभणी जिल्हा शल्य चिकित्सकांना जिल्हा शासकीय रुग्णालयातील गलथानपणाच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेने घातला घेराव...!


💥शल्य चिकित्सकांना घेराव घालत प्रश्‍नांचा केला भडीमार ; दोन दिवसात सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशाराही💥 

परभणी (दि.२३ सप्टेंबर) : परभणी जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयातील गलथान कारभारा विरोधात रिपब्लिकन सेनेने आज गुरुवार दि.२३ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा शल्य चिकित्सकांना घेराव घालून अक्षरशः प्रश्‍नांचा भडीमार करीत येणाऱ्या दोन दिवसात जिल्हा शासकीय रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही दिला.


 रिपब्लिकन सेनेचे राज्य उपध्यक्ष विजय वाकोडे यांच्यासह सिध्दार्थ कसारे, आशिष वाकोडे, चंद्रकांत लहाने, द्वारकाबाई गंडले, सरुबाई जमदाडे, खमर फुलारी, प्रविण गायकवाड, निलेश डुमणे, आकाश मस्के, राजरत्न वाहुळे, नवाब पटेल, आकाश वाहुळे, शान वाहुळे, हर्षवर्धन काळे, विशाल कांबळे, सिध्दार्थ मुजमुले, आकाश नन्नावरे, दादाराव लाटे, पृथ्वीराज घुगे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्हा शल्य चिकित्सकांना घेराव घातला. यावेळी जिल्हा रुग्णालयात दि.०१ जानेवारीपासून ई.एन.टी.चे ऑपरेशन थेटर आजपर्यंत बंद असल्यामुळे सामान्य रुग्णांना बाहेर जावून शस्त्रक्रिया करावी लागत आहे. महिलांच्या गर्भ पिशवीचे ऑपरेशन अनेक महिन्यांपासून केले जात नाही, त्यांना नांदेड येथे पाठविण्यात येत आहे. सोनोग्राफी करीत असतांना कार्यालयीन वेळेत डॉक्टर उपस्थित नसतात. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. मेट्रो ब्लड बँक कर्मचार्‍यांच्या निष्क्रियतेमुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. फिजीशियन डॉक्टरांचा राऊंड वेळेवर होत नाही, त्यांच्या वेळा निश्‍चित करा. रुग्णालयात करण्यात येणार्‍या शस्त्रक्रियेस जाणीवपूर्वक वेळ लावून रुग्णांना त्रास दिला जातो आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये थॅलेसिमियाचे १८० रुग्ण आहेत. नियमाप्रमाणे त्यांना दर १५ दिवसाला मोफत रक्त दिले जावे, असे आदेश असतांनासुध्दा जाणिवपूर्वक त्यांना डोनर मागीताल जातो. रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून आरटीपीसीआर बंद आहे. रुग्णांना औषधी व शस्त्रक्रियेचे सामान बाहेरुन आणावे लागत आहे. रुग्णालयात कर्मचार्‍यांची कमतरता असल्यामुळे अस्थायी भरती तात्काळ करावी. रुग्णालयातील भोंगळ कारभारास आपण जबाबदार आहात, असा आरोप करीत अनेक प्रश्‍नांचा भडीमार केला. येत्या दोन दिवसात सर्व सुविधा उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही विजय वाकोडे यांनी दिला.

      यावेळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी येत्या दोन दिवसात सर्व सुविधा चालू केल्या जातील, असे आश्‍वासन आंदोलनकर्त्यांना दिले. याप्रसंगी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश डाके यांच्यासह अन्य डॉक्टरांची उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या