💥सत्ता डोक्यात गेलेल्या राजकीय कार्यकर्त्यांकडून पत्रकारास दमदाटी ; दबावामुळे पोलिसांकडून गुन्हा दाखल करायला टाळाटाळ...!


💥पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांचा आरोप💥

मुंबई --

 अधिकाऱ्यांच्या विरोधात बातमी असूनही आपल्या आमदार साहेबांच्या विरोधी बातमी आहे असे समजून चाकुर जि. लातुर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘देशोन्नती’ कार्यालयासमोर धुडगुस घालीत ‘देशोन्नती’चे प्रतिनिधी विकास स्वामी यांना दमदाटी करून अर्वाच्च शिवीगाळ केली. चाकुरच्या पत्रकारांनी चार-पाच दिवसांपूर्वीच केलेल्या तक्रारीची दखल न घेता दबावामुळे अर्जच दडवून ठेवला. लातुरच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणी गंभीरपणे लक्ष द्यावे व संबंधितांवर गुन्हे दाखल करून दादागिरी थांबवावी अन्यथा पत्रकारांना राज्यभर आंदोलन करावे लागेल, असा इशारा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी एका पत्रकान्वये दिला आहे.


एस.एम. देशमुख यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, सत्ता डोक्यात गेली की, माणूस बेभान होतो. लातुर जिल्ह्यातील  चाकूर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे कृतीतून दाखवून दिलं. बातमी अधिकारांच्या विरोधात होती, ती आपल्या साहेबांच्या म्हणजे आमदारांच्या विरोधात आहे असे समजून राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते उठले आणि ‘देशोन्नती’चे पत्रकार विकास स्वामी यांच्या कार्यालयासमोर गेले. तेथे त्यांनी धुडगूस घालत ‘देशोन्नती’ च्या अंकाची होळी केली.  कार्यकर्ते एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी स्वामी यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांना अर्वाच्च शिविगाळ ही केली. विषय इथंच संपत नाही. स्वामी आणि चाकूरच्या चार पाच पत्रकारांनी पोलिसात तक्रार दिली. मात्र पाच दिवस झाले अजून गुन्हा दाखल झालेला नाही. तक्रार अर्ज पोलिसांनी दडवून ठेवलाय. स्पष्ट दिसतंय की, पोलिसांवर कोणाचा तरी दबाव आहे म्हणून पोलीस गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करीत आहेत. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दादागिरीचा आणि पोलिसांच्या निष्क्रीयतेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई निषेध करीत आहे..

राज्यातील पत्रकारांवर पुन्हा हल्ले वाढले आहेत.  याचं कारण पत्रकारांच्या तक्रारी पोलीस दाखल करून घेत नाहीत आणि घेतल्या तरी पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करीत नाहीत. पोलीस दबावाखाली काम करताहेत हे चाकूरच्या घटनेनं पुन्हा दाखवून दिलं आहे. लातूरच्या जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या प्रकरणात लक्ष घालून पत्रकारांच्या विरोधात सुरू असलेली दादागिरी थांबवावी अन्यथा राज्यभर आंदोलन करावे लागेल. असा इशारा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे मुख्य निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी दिला आहे..


 टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या