💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - सकाळच्या महत्वाच्या बातम्या.....!


💥देशामध्ये सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांच्या मोबाईल फोनवर पाळत ठेवून हेरगिरी💥 

 ✍️ मोहन चौकेकर                                                                               

 १) नवी दिल्ली – देशात बऱ्याच राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट शांत झाली आहे. तर केरळ आणि महाराष्ट्रात आजही देशातील सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्ण आढळत आहेत. केरळमध्ये दिवसाला २० हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण सापडत आहेत. राज्यात संक्रमण वाढत असल्यानं विजयन सरकारवर अनेक स्तरातून टीका होत आहे. परंतु देशातील टॉप वायरोलॉजिस्ट डॉ. गगनदीप यांनी संक्रमणासाठी राज्यावर टीका करणं योग्य नाही असं म्हटलं आहे.

२) पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी दुपारी ४ वाजता जाहीर होणार आहे. 

३) नवी दिल्ली: आताच्या घडीला देशभरात पेगॅसस हेरगिरीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. या प्रकरणी लीक झालेल्या डेटामध्ये ३०० भारतीय मोबाईल नंबर आहेत. त्यापैकी ४० मोबाईल नंबर हे भारतीय पत्रकारांचे आहेत. तसेच विरोधी पक्षातील ३ मोठे नेते, मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री, संरक्षण संस्थेतील प्रमुख अधिकारी आणि उद्योगपतींचा यात समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला असून, यामुळे संसदेचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले. यातच आता भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने पेगॅसस प्रकरणाची चौकशी होऊन सत्य बाहेर आले पाहिजे, अशी मागणी केली आहे.

४) अकाेला : अकाेल्यातील आकाेट फैल परिसरात रहिवासी असलेला एक आराेपीला अमरावती येथील एका महिलेच्या साहाय्याने अमरावती जिल्ह्यातील वल्लभनगर येथे सेक्स रॅकेट चालविताना रंगेहाथ अटक करण्यात आली़. या सेक्स रॅकेट अड्ड्यावरून तीन युवतींची सुटका करण्यात आली असून आकाेट फैलातील आराेपी अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहे़.

५) धारूर : अरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडल्याची आणि लगतच्या राष्ट्रीय महामार्गाच्या बोगस कामाची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत या मागणीसाठी आज सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान शेतकर्‍यांनी राष्ट्रीय मार्गावर दोन तास रस्तारोको आंदोलन केले. दरम्यान, तीन महिन्यात साडवा बांधून देण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

६)बीड : जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा करणारा तांब्याचा पाईप तोडण्याचा प्रयत्न करणारा चोरटा बिनधास्त फिरत असल्याचे समोर आले आहे. ऑक्सिजन बंद करून ३५ रूग्णांच्या जीवाशी खेळूनही आरोग्य विभागाने या चोरट्याविरोधात सोमवारी दुपारी ४ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली नव्हती. त्यामुळे आता जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याच कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. यामुळे सामान्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

७) चिखली : देशरक्षणार्थ सैन्यदलात दाखल झालेल्या चिखलीतील कैलास भारत पवार या लष्करी जवानाला वीरमरण आले आहे. सियाचीन या अत्यंत खडतर ठिकाणी कर्तव्य बजावताना बर्फाळ डोंगरावरून पाय घसरून ते खाली कोसळल्यामुळे त्यांना वीरमरण आले आहे.

८) भडगाव (जि. जळगाव) : मोलमजुरी करणाऱ्या गरीब कुटुंबातील त्या दोघांनी एकमेकांवर प्रेम केले. पण त्याची घरच्यांना अजिबात कल्पना नव्हती. इथे जातीचा विषय नव्हता पण बोलण्याचे धाडस न दाखवल्याने मुलासाठी वधू संशोधन सुरू झाले तेव्हा आता आपले लग्न होणार नाही, या विचाराने दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना कळली तेव्हा दोन्ही कुटुंबीयांनी या दोघांच्या प्रेमाला मूकसंमती दिली आणि अंत्यविधी करण्यापूर्वी दोघांचे लग्न लावून त्यांच्या आत्म्याची शांती केली. वाडे (ता. भडगाव) येथे रविवारी हा प्रकार घडला.

९) पुणे: 'रेल्वे हटवा शेतकरी वाचवा' व 'जमीन आमच्या मालकीची नाही कुणाच्या बापाची' अशा घोषणा देत आणि पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वेमार्गाला कडाडून विरोध करत जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. या प्रकल्पासाठी इंचभरही जमीन देणार नाही. असे सांगून सरकारने आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

१०) नाशिक : ब्रह्मगिरीसह सह्याद्री पर्वत रांगेच्या संरक्षणासाठी नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुतळ्यासमोर पर्यावरण कार्यकर्त्यांनी जनजागृती अभियानांतर्गत ब्रह्मगिरी पर्वत रांगा संरक्षित होण्यासाठी व पर्वतरांगामध्ये होत असलेली अवैध उत्खनन, बांधकाम थांबविण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. नाशिकरोड भागातील पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.२) ब्रम्हगीरी बचाव मोहीमेला पाठबळ देण्याकरिता जनजागृती अभियान राबविण्यात शिवाजी चौकात निदर्शने केली.

११) सांगली :  शेतकरी, व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक या घटकाचे पुरामुळे नुकसान झाले असले तरी कोणीही खचून जावू नका. राज्य सरकार आपल्या पाठीशी असून आपल्यामध्ये असलेले आपुलकीचे नाते बाळगुया, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारती विद्यापीठ येथे सांगली शहर पूरग्रस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधताना दिला. यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह शहरातील पूरग्रस्त नागरीक व व्यापारी उपस्थित होते.

१२)सांगली - मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे आज सांगलीतील पूरग्रस्त पाहणी दौऱ्यावर होते. जुलै महिन्यात महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर शेती, व्यापार, उद्योग, घरे यांचे नुकसान झाले आहे. पुन्हा असे होऊ नये यासाठी तात्काळ आणि दूरगामी अशा दोन्ही स्वरुपाच्या उपाययोजनांवर काम करावे लागेल. महापुरासारख्या समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजनांसाठी प्राधान्य दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. सांगलीतील पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यात चर्चा झाल्याचेही वृत्त आहे.

१३) अकोला : : जिल्ह्यात सोमवारी (दि. २) आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या ५७,७६७ झाली आहे. दरम्यान, आणखी तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली.

१४)औरंगाबाद : एखाद्या रुग्णाला छातीत वेदना होत असतील अथवा हार्ट अटॅक आला की अगोदर ईसीजी काढला जातो. त्यासाठी रुग्णालयात मोठे यंत्र हाताळण्याची कसरत करावी लागते. मंग प्रिंट काढायची, त्याचा फोटो काढून वरिष्ठांना मोबाईलवर पाठवायचा आणि मार्गदर्शन मिळताच उपचार सुरू करायचे. तोपर्यंत रुग्णाचा जीव टांगणीला लागलेला असतो. यावर उपाय म्हणून शहरातील तीन तरुणांनी अगदी खिशात मावेल आणि काही मिनिटांत मोबाईलवर रिपोर्ट देणारे स्मार्ट ईसीजी यंत्र तयार केले आहे.

१५) कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 233.18 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

१६) कोल्हापूर : खाजगी बसेस मधून होणाऱ्या मालवाहतुकीला आळा घालण्यासाठी कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या भरारी पथकानी सोमवारी २१ बसेस वर कारवाई केली.

१७) नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मनपाच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी १६ ते ३१ जुलैदरम्यान शहरात सर्वेक्षण केले. ९८,००६ घरांपैकी ५,९२९ घरांत डेंग्यू अळी आढळून आली. तर तब्बल १,०६४ रुग्ण तापाचे आढळून आले.

१८) पुणे : पुणे प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रारूप विकास आराखड्यात जिल्ह्यातील चारही बाजूच्या १८ झोनमधील २३३ गावांवर प्रामुख्याने फोकस केला आहे. हे १८ झोन जिल्ह्याची ग्रोथ सेंटर ठरणार आहेत. याठिकाणी मेट्रो, रिंगरोड, क्रिसेंट रेल्वे, क्रीडा विद्यापीठ, आयटी हब असे प्रामुख्याने महत्त्वाचे मोठे प्रकल्प पीएमआरडीएने प्रस्तावित केले आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा ही १८ ठिकाणे ग्रोथ सेंटर ठरणार आहेत.

१९) सातारा : देशामध्ये सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांच्या मोबाईल फोनवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनेच इस्त्राईलमधील एका खासगी कंपनीकडून हे सॉफ्टवेअर खरेदी केले. मात्र, सरकार कुठलेही स्पष्टीकरण करत नाही. ही हेरगिरी म्हणजे लोकशाहीचा खून आहे, अशी सडेतोड टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या