💥महाराष्ट्र पोलिसांचे राज्यातील जनतेला आवाहन ; कोरोना महामारी विरोधातील युद्ध मिळून लढूया अन् मिळून जिंकूया…..!


💥विनाकारण कारवाई करू नका ; कोणी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करीत असेल तर कारवाई करा - पोलिस महासंचालक

कोरोनाविरोधात मोठे युद्ध सुरू आहे. हे युद्ध आपल्या सर्वांना एकसाथ होऊन लढायचे आणि जिंकायचे आहे. आम्ही रस्त्यावर आहोत. तुम्ही फक्त सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करीत घरीच थांबायचे आहे. जनतेकडून आम्हाला केवळ एवढीच अपेक्षा आहे, असे आवाहन करतानाच कोणावरही विनाकारण कारवाई करू नका, परंतु कोणी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करीत असेल तर कारवाई नक्की करा,असे सर्व पोलिसांना आदेश दिल्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी आज सांगितले.


राज्यात कोरोनाची बिकट परिस्थिती आहे. म्हणून सरकारने संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून नागरिकांना जास्त त्रास होणार नाही याचा विचार करून पुढील 15 दिवसांसाठी काही निर्बंध लागू केले आहेत. जनतेने केवळ त्या नियमांचे पालन करायचे आहे. विनाकारण कोणी घराबाहेर पडायचे नाही आणि दुसऱयाला पडू द्यायचे नाही. कोरोनाला हरविण्यासाठी केवळ एवढेच करायचे आहे. त्यामुळे नागरिकांकडून आम्हाला एवढेच सहकार्य पाहिजे असल्याची अपेक्षा महासंचालक संजय पांडे यांनी व्यक्त केली आहे. अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वाहतूक सुरूच राहणार आहेत. तेव्हा कोणी नागरिक काही कामानिमित्त घराबाहेर पडलेले सापडले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू नका, त्यांना फटकावू नका, त्यांच्यावर चार्ज मारू नका, नागरिकांशी अदबीने बोला, त्यांना समजावून सांगा असे निर्देश पोलिसांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. परंतु इतके सर्व करीत असतानाही कोणी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंघन करताना सापडला तर मात्र संबंधितांवर नक्की कारवाई करा, असेही स्पष्ट निर्देश दिल्याचे संजय पांडे यांनी यावेळी स्पष्ट केले. नागरिकांनी 15 दिवस संयम ठेवत नियमांचे पालन केल्यास कोरोनावर नक्की मात करू असा विश्वासदेखील संजय पांडे यांनी व्यक्त केला.

💥आमची इच्छा नाही, तुम्ही ती वेळ आणू देऊ नका💥

राज्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. तर कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. राज्यात संचारबंदी लागू झाली असल्याने नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. आम्ही कोणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची मी हमी देतो. आमची कोणालाही त्रास द्यायची अजिबात इच्छा नाही, परंतु विनाकारण कोणी नियमांचे उल्लंघन करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू देऊ नका, असेही संजय पांडे यांनी सांगितले आहे.

💥पास सिस्टम नाही,योग्य कारण असल्यास अडवणार नाही💥

पूर्वीप्रमाणे यंदा पासेसची सिस्टम नसावी अशी आम्ही शासनाला विनंती केली होती. त्यानुसार सरकारनेदेखील पास सिस्टम ठेवण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता राज्यात कुठेही जायचे असेल तर पासेसची आवश्यकता नसेल. हे जरी स्पष्ट असले तरी विनाकारण कोणी कुठेही जाऊ नये. जर एखाद्या ठिकाणी जाण्यासाठीचे कारण महत्त्वाचे असेल तरच प्रवासासाठी मुभा दिली जाईल. अशा वेळी खासगी वाहनासदेखील परवानगी राहील असेही संजय पांडे यांनी स्पष्ट केले.

💥फक्त आवाज द्या, मदतीला आहोत,पण…💥

मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पोलीस सतर्क आणि तत्पर आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी आपली लढाई सुरू आहे. ही लढाई आपण निश्चित जिंकणारच… त्यासाठी सर्वांना केवळ नियमांचे पालन करायचे आहे. तुम्हाला कोणतीही अडचण आली, मदत पाहिजे असेल तर फक्त आवाज द्या…आम्ही केव्हाही हजर आहोत. आमची नागरिकांकडून दुसरी पुठलीही अपेक्षा नाही. केवळ नियमांचे पालन करा, एवढेच आमचे आवाहन असून मुंबईकर आम्हाला नक्की साथ देतील, असा विश्वास मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी व्यक्त केला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या