परभणी (दि.६ एप्रिल) - परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष - उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतून जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना बहुमताअभावीच अखेर माघार घ्यावी लागली.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या दोन्ही पदांच्या निवडीकरिता आज मंगळवार दि.६ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ११-०० वाजता जिल्हा बँकेत नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सभा आयोजित करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे हे अध्यक्षस्थानी होते. सकाळी अकरा वाजता अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी माजी राज्यमंत्री तथा आमदार सुरेश वरपुडकर व सौ. प्रेरणा वरपुडकर या दोघांनी अध्यक्ष पदासाठी,राजेश पाटील गोरेगावकर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. निर्धारित वेळेत या दोन्ही पदाकरिता अन्य कोणीही अर्ज दाखल केला नाही. छानणी पाठोपाठ माघारीच्या प्रक्रियेत सौ.प्रेरणा वरपुडकर यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अध्यक्षपदासाठी वरपुडकर व उपाध्यक्षपदासाठी गोरेगावकर या दोघांचा एकमेव अर्ज रिंगणात राहीला. पर्यायाने निवडणूक निर्णय अधिकार्यांनी या दोघांची बिनविरोध निवडीची घोषणा केली.
या दोन्ही पदाच्या निवडीच्या बैठकीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ बोर्डीकर हे या बैठकीकीकडे फिरकले नाहीत. न्यायालयीन आदेशामुळेच ते बैठकीपासून दूर राहिले. तर आमदार दुर्राणी हेही या सभेकडे फिरकले नाहीत. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानातील गुफ्तगुनंतर दुर्राणी यांनी बैठकीऐवजी पाथरी गाठण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांचे कट्टर समर्थक नवनिर्वाचित संचालक दत्ता मायंदळे हेही त्यांच्यासोबत पाथरीकडे रवाना झाले.
या विशेष सभेस आमदार सौ. मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार तानाजीराव मुटकुळे, भगवानराव सानप, आनंद भरोसे, भावना कदम बोर्डीकर, माजी खासदार अॅड. शिवाजी माने हे उपस्थित होते. या व्यतिरीक्त आमदार वरपुडकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर, आमदार राजू नवघरे, माजी आमदार सुरेश देशमुख, भगवानराव वाघमारे, सौ. प्रेरणा वरपुडकर, राजेश पाटील गोरेगावकर, राजेश विटेकर, अतुल सरोदे,देसाई,गणेशराव रोकडे, पंडीतराव चोखट,आदी उपस्थित होते...
0 टिप्पण्या