💥शिवसेना नेते रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी किरीट सोमय्यांना नोटीस पाठवली💥
मुंबई: सध्या महाराष्ट्रात अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण चांगलंच गाजतंय.‐ दोन दिवसांपूर्वी अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि कन्या यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर काही आरोप केले होते. भाजप नेत्यांनी अधिवेशनात मनसुख हिरेन प्रकरण आक्रमकतेने मांडलं तसंच अन्वय नाईक प्रकरण का मांडलं नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. याच प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्यावर काही आरोप केले होते. या आरोपात तथ्य नसल्याचे सांगत वायकरांनी सोमय्या यांना मानहानीची नोटीस पाठवली. सोमय्या यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांनी माझी आणि माझ्या पत्नीची माफी मागावी असं नोटीशीत सांगण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांनी स्वत: ट्वीट करून त्यांच्याविरोधात आलेल्या नोटीशीतील दोन पानांचा फोटो पोस्ट केला आहे.
किरीट सोमय्या यांना मिळालेल्या नोटीशीनुसार, रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी किरीट सोमय्यांना नोटीस पाठवली आहे. या नोटीशीत म्हटले आहे की किरीट सोमय्या आणि इतर लोकांनी वायकर दाम्पत्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. या आरोपांना दुजोरा देणारे कसलेही पुरावे अद्याप सादर करणं कोणालाही शक्य झालेलं नाही. त्यामुळे वायकर दाम्पत्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी त्यांच्याबद्दल केलेली सर्व विधाने अधिकृतरित्या मागे घ्यावीत. तसेच वायकर दाम्पत्याची जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी. तसेच, ज्या प्रसारमाध्यमांनी या प्रकरणाबद्दल काही बातम्या प्रसिद्ध करून त्यात वायकर कुटुंबाची बदनामी केली आहे त्यांनीदेखील त्या बातम्या मागे घ्याव्यात, असे या नोटीशीत नमूद करण्यात आले आहे.
सोमय्या यांनी वायकर दाम्पत्यावर केलेले आरोप:- अर्णब गोस्वामी अटक प्रकरणाच्या वेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्यावर गंभीर आरोप केले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आर्किटेक्ट अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. तसेच, रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथील कोर्लईजवळ रश्मी ठाकरे आणि रवींद्र वायकरांच्या पत्नी मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली आहे, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच, ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली होती.
0 टिप्पण्या