💥राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती💥
✍️विदर्भ,मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करणार✍️
✍️विदर्भ,मराठवाडा विकास महामंडळ असल्याचे गृहीत धरुनच अर्थसंकल्पात निधीवाटप✍️
✍️कोकण,उत्तर महाराष्ट्र स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळासाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर✍️
✍️महाराष्ट्राच्या विकासासाठी विधान परिषदेच्या बारा आमदारांची नियुक्ती होणंही आवश्यक✍️
मुंबई (दि.१ मार्च) :- विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळं अस्तित्वात असल्याचं गृहित धरुन निधीवाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल. विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वंकष विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. विधान परिषदेतील बारा आमदारांची नियुक्ती जाहीर होणेही तितकंच महत्वाचे असल्याचे सांगून या मुद्याकडेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
विधानसभेत उपस्थित एका चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहितीही, उपमुख्यमंत्र्यांनी दिली. विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे राज्य सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी विधान परिषदेसाठी राज्य सरकारने शिफारस केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्याही तातडीने होणे आवश्यक आहे. विधान परिषदेतील बारा आमदारांच्या नियुक्तीची घोषणाही तातडीने होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या