💥दिवसभरात येणारे सगळे कामाचे दूरध्वनी स्वत: घेणारे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे...!💥मुख्यमंत्री ठाकरे सरकार आणि राज्याचे प्रशासन यांनी कोरोनाविराेधातील या लढ्यासाठी खास रणनीती आखली💥

कोरोनाच्या संक्रमणामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला २२ जून रोजी तीन महिने होऊन गेले. राज्याची सत्त्वपरीक्षाच पाहणारा हा कालखंड. या काळात वेगवेगळ्या टप्प्यांत, विविध आघाड्यांवर संपूर्ण राज्याने या संकटाचा मुकाबला केला. अजूनही हे युद्ध संपलेले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार आणि राज्याचे प्रशासन यांनी कोरोनाविराेधातील या लढ्यासाठी खास रणनीती आखली, विविध उपाययोजना केल्या. राज्यातील डॉक्टर, पोलिस, अन्य सरकारी कर्मचारी यांच्यापासून सामान्य सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी या लढ्यात आपले योगदान दिले. 

आपण आपल्या मनात ज्या प्रतिमा पक्‍क्‍या करीत असतो, जे समज वागवित असतो ते आणि वस्तुस्थिती यांचा नेहमीच संबंध असतो असे नाही. आणि त्यामुळेच आपली फसगत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत अनेकांची अशी फसगत झाली आहे. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा नाके मुरडणाऱ्यांची राज्यात कमतरता नव्हती. त्यांचे पक्षीय विरोधक तर त्यात होतेच, पण अनेक सामान्य नागरिकांच्याही मनात तेव्हा शंका होत्या, की हे कसे काय राज्याचा गाडा हाकणार? त्यांची प्रकृती नाजूक. शिवाय आघाडी सरकारचे त्रांगडे. हे सरकार काही काम करू शकणार नाही, असाच अनेकांचा होरा होता.  पण आज उद्धव यांनी आपल्या त्या साऱ्या टीकाकारांना उताणे पाडले आहे.

केवळ हेच नव्हे, तर राज्यातील जनतेच्या मनात- मुख्यमंत्री असावा तर असा- असा एक विश्‍वास निर्माण करण्यात त्यांना यश आले आहे. कालपर्यंत जे विरोधक होते किंवा उद्धव यांच्या हिंदुत्वासारख्या विविध भूमिकांना ज्यांचा विरोध होता असे लोकही आज त्यांच्या कामाची स्तुती करताना दिसत आहेत. उद्धव यांच्यात आज अनेकांना एक जाणता लोकनेता दिसू लागला आहे. हे नेमके झाले कसे हे खरोखरच समजून घेण्याची गरज आहे. आणि ते करताना हेही लक्षात घेण्याची आवश्‍यकता आहे, की ही काही भक्तीसांप्रदायिक गरज नाही. उद्धव ठाकरे यांची बदललेली प्रतिमा समजून घेणे याचा अर्थ त्यांचे पोवाडे गाणे असा नसून, एखादा नेता कोणत्या गुणांच्या बळावर जनप्रिय ठरतो, ही बाब जाणून घेणे आहे.

💥ही लढाई वेगळीच होती💥

आता राज्यावर आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अशी महासंकटे कधी आली नाहीत, असे नाही. बॉम्बस्फोट, भूकंप, महापूर, दुष्काळ अशी अनेक संकटे आजवरच्या मुख्यमंत्र्यांनी पेललेली आहेत. तेव्हा उद्धव यांनी कोरोनाच्या संकटाचा मुकाबला धीराने केला यात काय विशेष, असा प्रश्‍न कुणास पडू शकतो. पण यात एक समस्या आहे. ती म्हणजे कोरोनाचे संकट हे आजवर आलेल्या अनेक संकटांहून निराळे आहे, अभूतपूर्व आहे. हजारो नागरिकांचे प्राण, अवघी अर्थव्यवस्था येथे पणाला लागलेली आहे. आणि हे संकट कोसळले आहे ते राज्याच्या कारभाराचा, प्रशासनाचा काडीमात्र अनुभव नसलेल्या मुख्यमंत्र्यांवर. एक पक्ष चालवणे वेगळे आणि राज्याचा गाडा - तोही अशा संकटसमयी हाकणे वेगळे. तशात कोरोनासारख्या आपत्तीशी लढण्याचा ना कुणाला पूर्वानुभव होता, ना त्यासाठीची तयारी होती.

💥विषयाचा केला बारकाईने अभ्यास💥

अशा प्रतिकूलतेत उद्धव यांना कोरोनाविरोधातील युद्ध लढायचे होते. या लढाईतील त्यांनी एक शस्त्र परजले, ते म्हणजे अभ्यासाचे. महाराष्ट्रातील जनतेला अभ्यास करणारे मुख्यमंत्री तसे सुपरिचित आहेत; परंतु उद्धव यांनी विषय लांबविण्यासाठी नव्हे, तर विषयाच्या जवळ जाण्यासाठी अभ्यास सुरू केला. आपण 'बॉस' म्हणजे आपल्यालाच सर्व काही कळते; असा भल्याभल्यांचा समज असतो आणि त्यातून ते आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत असतात. "पहिल्या दिवसापासून उद्धव यांनी प्रशासन आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून कोरोना साथीबाबतची अधिकृत माहिती घेण्यास सुरुवात केली. आजही त्यात खंड नाही. जगात काय सुरू आहे, कोणता देश या साथीशी कशाप्रकारे लढत आहे, पाश्‍चात्त्य देशांत कोव्हिड-१९ बाबत काय संशोधन सुरू आहे, यावर ते बारीक लक्ष ठेवून असतात. निर्णय घेताना याचा नक्कीच फायदा होतो," असे उद्धव यांची कार्यपद्धती जवळून पाहणारे अधिकारी, पत्रकार सांगतात.

💥संवादाच्या शैलीमुळे वेगळेपणा ठसतो💥

दुसरी बाब म्हणजे त्यांनी या युद्धात त्यांनी स्वतःला पूर्णतः झोकून दिल्याचे दिसते आहे. लॉकडाऊनच्या काळात ते बहुतांशी 'मातोश्री' वरूनच सगळी सूत्रे हलवत आहेत. येथील त्यांचा बहुतांश वेळ विविध मंत्र्यांशी, लोकप्रतिनिधींशी, अधिकाऱ्यांशी बोलणे, अधिकाऱ्यांकडून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील परिस्थितीची तपशीलवार माहिती घेणे, त्यांना आदेश देणे, समस्या सोडविणे यातच जातो. त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसभरात येणारे सगळे कामाचे दूरध्वनी ते स्वतः घेतात. गेल्या काही दिवसांत परप्रांतीय नागरिकांचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर समोर आला. या काळात ते विविध राज्यांतील महत्त्वाच्या व्यक्तींशी सातत्याने संपर्कात होते. त्यांच्याकडून माहितीची देवाणघेवाण करीत होते. फोनवरून मिळणारी माहिती स्वतः लिहून घेणे, त्यावर नंतर कार्यवाही करणे ही एक त्यांची पद्धत. अशा अनेक आघाड्यांवर ते सतत कार्यरत असतात, पण त्यांचे वेगळेपण लोकमानसावर ठसले ते त्यांच्या संवादाच्या शैलीमुळे!

💥सामान्यांना भावली भाषणे💥

माहिती दडवणे वा चुकीची माहिती सांगणे हाच जनतेशी संवाद असे समजण्याच्या सध्याच्या काळात उद्धव ठाकरे एखाद्या कुटुंबप्रमुखाप्रमाणे लोकांसमोर येत राहिले. वृत्तवाहिन्या असोत वा फेसबुक लाईव्ह, यांतून ते लोकांशी बोलत राहिले. त्यात कोठेही आढ्यता नव्हती, लपवाछपवी नव्हती, शब्दांचे फालतू फुलोरे नव्हते. प्रामाणिक कळकळीने भारलेले त्यांचे शब्द आणि त्यातून प्रकट होणारी तथ्ये ही लोकांना भावत होती. समाजमाध्यमांतील जल्पकांनी तेव्हाही आरडाओरडा चालवला होता, की हे काही मुख्यमंत्र्यांचे भाषण वाटत नाही. पण सामान्य नागरिकांना मात्र तेच भावत होते.
नागरिकांचे मनोबल उंचावत ठेवणे, त्यांना दिलासा देणे याबरोबरच त्यांना या युद्धात सहभागी करून घेणे हे सर्व काही उद्धव त्यांच्या संवादशैलीतून साधत होते. त्यांच्या काही निर्णयांबद्दल, त्यातही लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यातील निर्णयांबद्दल अनेकांनी आक्षेप नोंदविले. त्यावर टीकाही झाली, पण तरीही कोणी उद्धव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली नाही. हे सारे करीत असताना मुख्यमंत्र्यांची अन्य कर्तव्ये आणि पक्षप्रमुख म्हणून कामेही ते पाहात होते. शिवसैनिकांची फोनवर चौकशी करणे, त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या सोपवून कोरोनायुद्धातील त्यांचा सहभाग वाढविणे हेही ते करीत होते, करीत आहेत.

💥कोरोनाच्या युद्धातले सक्षम सरसेनापती💥

त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात होतीच. नाश्‍ता, जेवण, औषधे हे ठरल्यावेळी ते घेतात की नाही, याकडे घरातून बारीक लक्ष होतेच. आणि म्हणूनच ते राज्याच्या प्रकृतीची बारकाईने काळजी घेऊ शकत होते. उद्या जेव्हा कोरोना युद्धाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा या युद्धातील सक्षम सरसेनापती म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामाची नोंद त्यांच्या विरोधकांनाही घ्यावीच लागेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या