💥सुलभ पीककर्ज वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी विशेष बैठक बोलावून विविध बँकांना सूचना💥
परभणी - (दि.04 जुन)-खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँक अपवाद इतर बँकेचे पीककर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याची धक्कादायक माहिती शासकीय सूत्रांनी प्रेसनोटद्वारे दिली.
दरम्यान, सुलभ पीककर्ज वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी विशेष बैठक बोलावून विविध बँकांना सूचना निर्गमीत केल्या आहेत.
राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस पीककर्ज वाटपासंदर्भात उदिष्ट दिल्या गेले आहेत. जिल्हा उपनिबंधक तसेच जिल्हा अग्रणी बँक अधिका-यांमार्फत बँकनिहाय खरीप पीक कर्ज वाटपाबाबत नियमितपणे आढावा सुध्दा घेतला जातो आहे. 19 मे रोजी या अनुषंगानेच जिल्हा समन्वयकांनी विशेष सभेतून पीककर्ज वाटपाचा आढावा घेतला. तेव्हा जिल्ह्यातील बँकांना देण्यात आलेल्या वार्षीक कृषी पतपुरवठा लक्षांकानुसार जिल्ह्यातील खरीप पीक कर्ज वाटपाचे प्रमाण जिल्हा परभणी अपवाद इतर बँकांचे अत्यल्प असे प्रमाण असल्याची खळबळजनक माहिती निदर्शनास आली. दै.दिलासाने पीककर्ज वाटपात बँकांच्या उदासिनतेबाबत आठ दिवसांपुर्वीच प्रकाशझोत टाकून वास्तव जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवरच जिल्हा समन्वयकांनी पीककर्ज वाटप करतांना बँकांना येत असलेल्या अडीअडचणीबाबत आढावा घेतला होता. तेव्हा जिल्ह्यातील बँकांचे उदासिनतेचे धोरण प्रकर्षाने पुढे आले. जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या अनुषंगाने पीक वाटपाचे काम जलदगतीने व्हावे, यादृष्टीने काही सूचना निर्गमीत केल्या. त्याप्रमाणे 1 लाख 60 हजारापर्यंतच्या पीककर्जासाठी इतर बँकांचे बेबाकी प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी शेतक-यांचे स्वयंघोषणा पत्र घेण्यात यावे, नवीन शेतक-यांना तात्काळ अल्प मुदतीचे पीककर्ज वाटप व्हावे, पीक कर्ज मागणीचे अर्ज ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावे. ते अर्जाची पडताळणी करीत तात्काळ संबंधीत बँकांनी पीककर्ज वाटप करावे, कर्ज वाटपा संदर्भात जनजागृती करावी, जुन महिना संपेपर्यंत पात्र कर्जदारांना पीककर्ज वाटप करावे, असे निर्देश दिले.
दरम्यान, जिल्हा उपनिबंधकांनी या अभियानाच्या अनुषंगाने दहा गोष्टी नमुद केल्या आहेत.
💥अशी आहे टक्केवारी💥
जिल्ह्यातील व्यापारी बँकांनी 867 सभासदांना कर्ज वाटप केले असून ती टक्केवारी 0.72 एवढी असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दै.दिलासास पाठविलेल्या प्रेसनोटद्वारे दिली आहे. ग्रामीण बँकांनी 1 हजार 653 सभासदांना कर्ज वाटप केले असून ती टक्केवारी 5.14 तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने 35 हजार 642 शेतक-यांना पीककर्ज वितरीत केले असून ती टक्केवारी 67.42 टक्के इतकी एवढी असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधकांनी दिली.
0 टिप्पण्या