💥संचारबंदीचा एक दिवस वाढला; पेट्रोल व जीवनावश्यक वस्तु विक्री सकाळी ८ ते १२ पर्यतच...!


💥जिल्हाधिकारी श्री ऋषीकेश मोडक यांनी आज नव्याने काढले आदेश💥

वाशीम (फुलचंद भगत)- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी २५ मार्चपासून सुरु झालेली संचारबंदी एक दिवसाने वाढली असून आता १४ एप्रिल ऐवजी १५ एप्रिलपर्यत संचारबंदी सुरु राहणार आहे. यादरम्यान जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, आस्थापना आणि पेट्रोलपंपावर लोकांची गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाकडून वेळेची कपात करण्यात आली असून याआधी सकाळी ८ ते दुपारी २ पर्यत असलेली ही वेळ आता सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यतच ठेवण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री ऋषीकेश मोडक यांनी आज (ता. १) नव्याने काढले आहेत. हे आदेश दवाखाने, हॉस्पीटल व औषधी विक्री केंद्रांना लागु राहणार नाहीत.
 कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणे हा कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकमेव प्रभावी उपाय आहे. संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व अन्नधान्य, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने व पेट्रोलपंप सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, औषध विक्री करणारी दुकाने, सर्व हॉस्पिटल नियमिपणे सुरु राहतील.
पुढील १४ दिवस महत्वाचे, सूचनांचे पालन करा : जिल्हाधिकारी
 कोरोना विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी १५ एप्रिल पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. कोरोना’ला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांमध्ये हे १४ दिवस अतिशय महत्वाचे आहेत. या कालावधीत प्रत्येकाने स्वयंशिस्त पाळावी, विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रशासनामार्फत देण्यात येत असलेल्या सूचनांचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे. शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी सुद्धा आपापल्या आरोग्याची काळजी घ्यावी, एकत्र येणे टाळावे. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळूनच रांगेत उभे रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
 जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी होवू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत आवश्यकता असेल तरच नागरिकांनी कार्यालयात यावे. अन्यथा शासकीय कार्यालयात येणे टाळावे, तसेच सामुहिक निवेदने, अर्ज, तक्रारी, फिर्याद कार्यालयास प्रत्यक्ष येवून सादर करू नये, असे आदेश देण्यात आले होते. हे आदेश आता १५ एप्रिल २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करणे, बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेशास मनाई व अत्यावश्यक कारण वगळता जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई करण्याबाबतचा २३ मार्च २०२० रोजीचा आदेश सुद्धा १५ एप्रिल २०२० पर्यंत लागू राहणार आहे.
 या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी आज निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या