💥हातावर क्वारंटाईनचा शिक्का असतानाही मुंबई सेंट्रलला ते सहा जण ट्रेनमध्ये चढले आणि…!💥प्रवाशांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने या सहा जणांना बोरिवली स्थानकात उतरवण्यात आलं💥

एकीकडे करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असताना काहीजण मात्र बेजबाबदरपणाने वागत असल्याचं दिसत आहे. नुकताच असाच एक प्रकार समोर आला आहे. हातावर अलगीकरणाचा शिक्का असतानाही सहा प्रवासी एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करत असल्याची घटना समोर आली आहे. या सर्वांनी मुंबई सेंट्रल स्थानकातून प्रवास सुरु केला होता. वडोदरला जाण्यासाठी ते निघाले होते. मात्र ऐनवेळी इतर प्रवाशांनी ही बाब लक्षात आणून दिल्याने या सहा जणांना बोरिवली स्थानकात उतरवण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्वजण सिंगापूरहून परतले होते. या सर्वांच्या हातावर अलगीकरणाचा शिक्का मारण्यात आला होता. या सर्वांना आपल्या घरातच थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र तरीही हे सर्वजण वडोदराला जाण्यासाठी निघाले होते. मुंबई सेंट्रलला त्यांनी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी सौराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास सुरु केला होता. पण ही बाब लक्षात येताच सर्वांना बोरिवली स्थानकात उतरवण्यात आलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या भाषणात बोलताना काही प्रवासी जे परदेशातून प्रवास करुन आले आहेत त्यांनी घरी थांबवण्याची सूचना देण्यात आलेली आहे. पण ते त्याचं पालन करत नसल्याचं म्हटलं होतं. “बाहेरच्या देशातून जे लोक येत आहेत ते आपलेच आहेत. कुणाचा मुलगा असेल, काका, मामा असतील त्यांच्यासाठी आपले दरवाजे उघडेच आहेत. पण परदेशातून आल्यानंतर दिलेल्या सूचना पाळा. हातावर शिक्का मारलेले लोक इकडे तिकडे फिरत आहेत. आपली माहिती लपवत आहेत..हे योग्य नाही,” असं त्यांनी म्हटलं होतं...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या