💥चीनमधील डॉक्टरांनी बऱ्या होणाऱ्या रुग्णाच्या थुंकी आणि विष्ठेतील कोरोनाचा जिवंत विषाणू शोधला...!


 💥रुग्णांना देण्यात येणाऱ्या डिस्चार्जबद्दल काही प्रश्न उपस्थित; चिंता वाढली💥


 जगभरात कोरोनाचं थैमान सुरूच आहे. कोरोनामुळे ३८ हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप तरी जगभरातल्या शास्त्रज्ञांना कोरोनावरील लस शोधता आलेली नाही. याबद्दल चीनमध्येही संशोधन सुरू आहे. चीनमधील डॉक्टरांनी बऱ्या होणाऱ्या रुग्णाच्या थुंकी आणि विष्ठेतील कोरोनाचा जिवंत विषाणू शोधला आहे. याशिवाय रुग्णांना देण्यात येणाऱ्या डिस्चार्जबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

कोरोनाबाधित व्यक्ती बरी होत असताना तिच्या घशातील लाळेची तपासणी केली जाते. ही चाचणी निगेटिव्ह आल्यावर रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. मात्र त्याचवेळी अनेकदा रुग्णाची रियल टाईम फ्लुरोसन्स पिलमरेस चेन रिऍक्शन (आरटी-पीसीआर) चाचणी पॉझिटिव्ह येते. अॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिन या जर्नलनं हे संशोधन प्रसिद्ध केलं आहे. आरटी-पीसीआर चाचणी शरीरातल्या आरअनए आणि डीएनएशी संबंधित आहे.

कोरोनाबाधित व्यक्तींना वेगळं ठेवलं जातं. त्यांच्या सुधारणा दिसू लागल्यावर त्यांना रुग्णालयातच ठेवायचं की डिस्चार्ज द्यायचा याचा निर्णय घशाजवळील लाळेच्या चाचणीवरुन ठरतो. केवळ घशाजवळील लाळेच्या चाचणीवरुन रुग्णाला घरी सोडण्याचा निर्णय घ्यायचा का, असा प्रश्न बीजिंग डिटान रुग्णालय आणि कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटीनं उपस्थित केला आहे. लाळेची चाचणी निगेटिव्ह आल्यानं व्यक्ती कोरोनामुक्त होते का, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.

याबद्दल अधिक संशोधन करण्यासाठी बीजिंग डिटान रुग्णालय आणि कॅपिटल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे कोरोना चाचणीचे अहवाल आरटी-पीसीआरशी पडताळून पाहण्यात आले. घशाजवळील लाळेसोबत बऱ्या होत असलेल्या रुग्णाची थुंकी आणि विष्ठादेखील तपासून पाहण्यात आली. २० जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालावधीत दाखल झालेल्या १३३ रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यातील २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे याच २२ जणांच्या घशाजवळील लाळेचे अहवाल निगेटिव्ह आले होते.

चीनमधील डॉक्टरांनी केलेल्या या संशोधनानंतरही काही प्रश्न अनुत्तरितच आहेत. एखाद्या रुग्णाचा थुंकी किंवा विष्ठेशी संबंधित अहवाल निगेटिव्ह आल्यास तिच्या माध्यमातून इतरांना कोरोनाची लागण होऊ शकते का, या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. हे संशोधन अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीनं करण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे याविषयी आणखी संशोधन आवश्यक असल्याचं अधोरेखित झालं आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या