💥धोका वाढला,कोरोना तिसऱ्या टप्प्यात; आता वेगाने होऊ शकतो गुणाकार...!
💥डॉ.गिरधर ग्यानी यांच्या सांगितल्याच 'द क्विंट' या इंग्रजी वृत्त संकेतस्थळानं याबद्दलचं वृत्त दिलंय💥


 कोरोनाचा धोका वाढला असून तो तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्याचं कोरोना बाधितांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांचे संयोजक डॉ. गिरधर ग्यानी यांनी सांगितलं. कोरोना तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असून त्याचं सामुदायिक संक्रमण सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. 'द क्विंट' या इंग्रजी वृत्त संकेतस्थळानं याबद्दलचं वृत्त दिलंय. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होण्याची शक्यता आहे. 

दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली प्रख्यात डॉक्टरांची आणि आरोग्य सेवा देणाऱ्या कंपन्यांमधील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला ग्यानी उपस्थित होते. कोरोनाच्या प्रादुर्भावात सामुदायिक संक्रमण अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यात कोरोना अतिशय वेगानं पसरतो आणि त्याचा केंद्रबिंदू शोधणं अवघड होतं. या टप्प्यात अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे तो नेमका कोणाकडून पसरला आहे, याचा माग काढणं कठीण असतं, अशा शब्दांत ग्यानी यांनी तिसऱ्या टप्प्यात काय होऊ शकतं, याची माहिती दिली.

आपण तिसऱ्या टप्प्यात पोहोचलो आहोत. आपल्या हाती अतिशय कमी वेळ उरला आहे. वाढणाऱ्या रुग्णांसाठी रुग्णालयं सज्ज ठेवावी लागणार आहेत. मात्र त्यासाठीही पुरेसा वेळ शिल्लक नाही. येत्या काही आठवड्यांमध्ये कधीही रुग्णांची संख्या अचानक वाढू शकते. त्यासाठी आवश्यक रुग्णालयं आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी वर्ग आपल्याकडे नाही, अशा शब्दांत ग्यानी यांनी वास्तव सांगितलं.

कोरोना चाचणी घेत असताना सरकार अजूनही जुन्याच पद्धतींचा वापर करत असल्याचं ग्यानी म्हणाले. यामध्ये तातडीनं बदल करायला हवा, असंदेखील ते पुढे म्हणाले. 'खोकला, श्वासोच्छवासात समस्या, ताप अशी तिन्ही लक्षणं आढळून येत असल्यावरच सध्या कोरोना चाचणी घेतली जात आहे. यातलं एक केवळ लक्षण असल्यास चाचणीच घेतली जात नाही. ही पद्धत बदलायला हवी. सरकारकडे कोरोना चाचणी करणारी पुरेशी किटदेखील नाहीत,' अशी महत्त्वाची माहिती ग्यानी यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या