💥जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; कोरोना रोखण्यासाठी फक्त लॉकडाऊन पुरेसं नाही...!



💥तर... जे आजारी व पीडित आहेत त्यांना शोधण्याची आणि देखरेखीखाली ठेवण्याची गरज💥 

कोरोना व्हायरसच्या धसक्याने जगातील अनेक देशांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनाने जगातील अन्य देशात शिरकाव केला आहे. वुहानमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लोकांना घरातून बाहेर पडू दिलं नाही. चीननंतर इटलीला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला. भारतातही कोरोनाचे ३९६ रुग्ण आढळून आले आहेत. तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊनच्या परिस्थितीत शहरातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. लोकांची रहदारी कमी झाली आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय प्रत्येक देश घेत आहे. महाराष्ट्रतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई ठप्प पडली आहे.

मात्र लॉकडाऊनवर जागतिक आरोग्य संघटनेने भाष्य केले आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी फक्त लॉकडाऊन पुरेसे नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डब्ल्यूएचओ(WHO)चे माईक रायन यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पुरेसं नाही तर जे आजारी आहेत, पीडित आहेत त्यांना शोधण्याची आणि देखरेखीखाली ठेवण्याची गरज आहे. तसे केलं तरच हे थांबवता येऊ शकते असं त्यांनी सांगितले.

तसेच लॉकडाऊनची सर्वात मोठी समस्या अशी आहे की जेव्हा ते संपेल तेव्हा लोक अचानक मोठ्या संख्येने बाहेर येतील आणि मग धोका वाढेल. चीनमधून पसरलेल्या कोरोना विषाणूने युरोप आणि अमेरिकेला विळख्यात घेतलं आहे. जगातील अनेक देशांनी आपल्या लोकांना त्यांच्या घरात राहण्यास सांगितले आहे, लॉकडाऊन जाहीर केले आहे. युरोपमधील बर्‍याच शहरांमध्ये बार, रेस्टॉरंटसह अनेक सुविधा काही दिवसांपासून बंद आहेत.

माईक रायन म्हणाले की जेव्हा चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाने लॉकडाऊन केले तेव्हा कोरोना विषाणूचा धोका असलेल्या प्रत्येक व्यक्तीची त्यांनी चौकशी केली. आता युरोप, अमेरिका आणि इतर देशांनी समान मॉडेल लागू केले पाहिजे. जर त्याचा प्रसार होण्यापासून रोखला गेला तर रोगाचा सामना केला जाऊ शकतो.

जगात कोरोना व्हायरसमुळे सुमारे तीन लाखांहून अधिक लोकांना ग्रस्त केलं आहे. तर जवळपास 14,000 लोकांचा मृत्यू झाला आहे. जर भारताबद्दल सांगितलं तर येथे सुमारे 396 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत आणि 7 जणांचा मृत्यू झाला आहे. देशाच्या बर्‍याच भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून लोकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या