💥महिलांच्या प्रश्नांसंदर्भात समन्वय समिती - महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर...!



💥महिलांच्या सक्षमीकरणासाठी काही नवीन योजना सुरु करण्याचे नियोजन💥

मुंबई : महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या, महिलांच्या सक्षमीकरणासाठी काही नवीन योजना सुरु करण्याचे नियोजन आहे. सध्या सुरु असलेल्या आणि नवीन योजनांसाठी अनुदानात वाढ आवश्यक आहे. राज्य शासन या अनुषंगाने पावले उचलत आहे. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास, गृह, विधी व न्याय, ग्रामविकास, कौशल्य विकास, शिक्षण अशा विविध विभागांमध्ये समन्वय आवश्यक आहे. यासाठी या सर्व विभागांची एक संयुक्त समिती नेमण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असे त्यांनी यावेळी सांगितले.

सर्वांनी मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा प्रश्न सुटणार नाही, असे नमूद करुन मंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, महिलांच्या प्रश्नाकडे जात आणि धर्माच्या आरशातून पाहून चालणार नाही. या सर्वांच्या पुढे जाऊन महिला प्रश्नाचा विचार केला तरच हा प्रश्न सुटू शकणार आहे.

महिलांसाठी शौचालये, कार्यालयांमध्ये पाळणाघरे, शाळांमधून मुलींची गळती, बालविवाह असे अनेक प्रश्न आहेत. बालविवाहामध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालनंतर आपल्या राज्याचा क्रमांक लागतो. हे बदलण्यासाठी या समस्येकडे डोळसपणे पाहून सर्वांनी हे रोखण्यासाठी काम करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
महिलांसाठी सुरु करण्यात आलेल्या वन स्टॉप सेंटरमध्ये एफआयआरसुद्धा दाखल करता आला पाहिजे. याबरोबरच मुला-मुलींना गुड टच आणि बॅड टचची माहिती होणे आवश्यक आहे. यासंदर्भात पावले उचलू, असे मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या