💥 मुंब्रा पोलीस स्थानकात 7 महिन्यांच्या गरोदर महिलेने केली तक्रार💥
✍ मोहन चौकेकर
मुंबई:- तिहेरी तलाक विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर भारतातील पहिला गुन्हा दाखल झाला आहे. एका मुस्लिम महिलेने मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून तिची सासू, सासरा आणि नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारारदार महिला 7 महिन्यांची गरोदर आहे. महिलेला अशा अवस्थेत तिच्या नवऱ्याने व्हॉट्सअॅपवर 'तलाक..तलाक..तलाक', असा मेसेज पाठवला होता. मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, 30 जुलैला तिहेरी तलाक विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत देखील मंजूर झाले. राज्यसभेत हे विधेयक 99 विरुद्ध 84 मतांनी मंजूर केले.आता विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा लागू होईल.
या विधेयकात या आहेत तरतूदी..
तिहेरी तलाक विधेयकाचे पूर्ण नाव मुस्लिम महिला (महिला अधिकार संरक्षण कायदा) विधेयक, 2019 असे आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर तोंडी, लेखी आणि अन्य कोणत्याही माध्यमातून तीन वेळा तलाक देण्यावर बंदी असेल. अशा पद्धतीने तलाक दिल्यास तो गुन्हा ठरेल. अशा पद्धतीने पत्नीला तलाक दिल्यास तो गुन्हा असेल आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करता येऊ शकेल.
तुरुंगवास आणि होणार दंड
एखाद्या व्यक्तीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास त्याला 3 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकते. त्याच बरोबर त्याला दंड देखील होऊ शकतो. अशा पद्धतीने पतीवर गुन्हा दाखल केल्यास जामीन मिळवण्यासाठी त्याला न्यायालयात जावे लागेल.
पत्नीला मिळणार नुकसान भरपाई
जर एखाद्या महिलेला तिहेरी तलाक दिला तर ती महिला पतीकडून नुकसान भरपाई मागू शकते. अर्थात पत्नीला किती नुकसान भरपाई द्यावी हे निश्चित करण्यात आलेले नाही. पीडित महिलेला किती नुकसान भरपाई द्यावी हे न्यायालयातील सुनावणीनंतर निश्चित केले जाईल.
मुलाचा ताबा कोणाला मिळणार?
तिहेरी तलाक विधेयकानुसार पीडित महिला अल्पवयीन मुलाचा ताबा स्वत:कडे मागू शकते. मुलाचा ताबा कोणाकडे द्यावा याचा निर्णय न्यायालयातील सुनावणीनंतर केला जाईल.
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या