💥मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले राजेंद्र काळे व सुधीर चेके पाटील यांनी केले आवाहन💥
✍ मोहन चौकेकर
बुलडाणा : मराठी पत्रकार परिषदेच्या संघटनात्मक, आंदोलनात्मक तथा उपक्रमात्मक कार्यक्रमात बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ नेहमीच आघाडीवर असतो. ऑगस्ट २०१७ ला याच पत्रकार संघाच्या माध्यमातून संतनगरी शेगाव येथे मराठी पत्रकार परिषदेचे भव्य-दिव्य राष्ट्रीय अधिवेशन पार पडले होते. आता ४२ वे अधिवेशन येत्या १७ व १८ ऑगस्ट रोजी नांदेड येथे होवू घातले असून, यासाठी जिल्हास्तरावरच्या पत्रकारांची बैठक संपन्न होवून शेगावप्रमाणे नांदेडचे अधिवेशनही एैतिहासिक करण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र काळे व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर चेके पाटील यांनी केले.
बुलडाणा जिल्हा पत्रकार भवनात शुक्रवारी ९ ऑगस्ट रोजी नांदेड अधिवेशनासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नांदेड अधिवेशनाला उपस्थिती दर्शविण्यासाठी पत्रकारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील अन्य तालुका पत्रकार संघानाही नांदेड अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. पत्रकारांच्या काही संघटना वेगळ्या असल्यातरी ‘पत्रकारांची मातृसंस्था’ व ८० वर्षाचा दैदिप्यमान इतिहास असलेल्या ‘मराठी पत्रकार परिषद’चे अधिवेशन ही तमाम पत्रकारांसाठी वैचारिक तथा धोरणात्मक दिशा देणारी पर्वणीच असते.
मराठा पत्रकार परिषदेशी संलग्न बुलडाणा जिल्हा पत्रकार संघालाही दैदिप्यमान इतिहास आहे. अनेक सामाजिक उपक्रम तथा प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात हा पत्रकार संघ नेहमीच आघाडीवर राहिला आहे. अवघ्या एका महिन्यात मराठी पत्रकार परिषदेचे ४१वे राष्ट्रीय अधिवेशनाची जबाबदारी बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाने समर्थपणे पेलून हे अधिवेशन भव्य-दिव्य प्रमाणात पार पाडले, असे यावेळी राजेंद्र काळे म्हणाले.
नांदेडच्या अधिवेशनासाठीही बुलडाणा जिल्ह्यातून पत्रकारांची मोठी उपस्थिती राहिल,त्या दृष्टीने नियोजन सुरु असल्याचे सुधीर चेके पाटील यांनी सांगितले. या बैठकीला अरुण जैन, राजेश डिडोळकर, चंद्रकांत बर्दे, रणजीतसिंह राजपूत, भानुदास लकडे, सुनिल तिजारे, अजय बिल्लारी, संजय जाधव, नितीन शिरसाठ, प्रेमकुमार राठोड, दिपक मोरे, संदीप वंत्रोले, संजय काळे, वसीम शेख, मनोज जैस्वाल, गणेश निकम, लक्ष्मीकांत बगाडे आदी अनेक पत्रकारांची उपस्थिती होती....
✍ मोहन चौकेकर
0 टिप्पण्या