💥राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बुरे दिन ? राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता जाणार ?


💥निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस नोटीस पक्षाला दिली नोटीस💥


✍ मोहन चौकेकर

नवी दिल्ली :--लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देशात अनेक राजकीय पक्षांना जोरदार धक्का बसला होता. आता निवडणूक आयोगाकडूनही या पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आयोगाने अनेक पक्षांना त्यांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे.

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला आज (गुरुवारी) नोटीस दिली आहे.

आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जबर धक्का बसला.

महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांच्या फक्त 5 जागा आल्या होत्या. यात काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले होते.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी हे आवश्यक :-

निवडणूक आयोग 1968 च्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते.

 त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार पाहिजे.

त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत किंवा तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली पाहिजे.

चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे.

राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले असले तरी इतर नियमांची पुर्तता करणे पक्षाला जमले नाही त्यामुळे पक्ष काय उत्तर देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली की त्या पक्षाला कार्यालयासाठी मोठ्या शहरांमध्ये कमी किंमतीत जागा आणि देशभर एकच निवडणूक चिन्ह अशा अनेक सुविधा मिळत असतात.

भारतातील सात राष्ट्रीय पक्ष :-

भारतीय जनता पक्ष (भाजप)

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस)

राष्ट्रवादी काँग्रेस

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

भारतीय कम्युनिस्ट पक्ष

बहुजन समाज पक्ष

तृणमुल काँग्रेस

✍ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या